फाटक हायस्कूलच्या विद्यार्थिनीची होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड–
रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूलच्या इयत्ता सहावी ‘अ’ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. स्पृहा तेजराज भावे हिची ‘डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2025–2026’ या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी निवड झाल्याने शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही प्रतिष्ठित स्पर्धा यंदा ४५व्या वर्षात पदार्पण करत असून देशभरातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक, कृती संशोधन प्रकल्प अहवाल आणि मुलाखत अशा चार टप्प्यांत पार पडते.
या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्या यशस्वीरीत्या पार करत कु. स्पृहा भावे हिने तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी आपली निवड निश्चित केली आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून या टप्प्यासाठी निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
यंदाच्या स्पर्धेची थीम ‘पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप)’ अशी असून मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारा कृती संशोधन प्रकल्प कु. स्पृहा सध्या तयार करत आहे. तिसऱ्या फेरीत हा प्रकल्प सादर करावयाचा असून त्यावर आधारित मुलाखत मुंबईतील वडाळा येथे १५ मार्च रोजी होणार आहे. या मुलाखतीचेही दोन टप्पे असतात.
पहिली मुलाखत प्रकल्प विषयावर आधारित असते, तर दुसरी सर्वसामान्य ज्ञानावर घेतली जाते.
या यशासाठी फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय कीर सर, विज्ञान शिक्षिका सौ. श्रावणी जोशी, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. मुरुडकर तसेच कला शिक्षक श्री. निलेश पावसकर यांनी तिला मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. कृती संशोधन प्रकल्पासाठी रत्नागिरी येथील संशोधक डॉ. स्वप्नजा मोहिते यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, उपाध्यक्ष ॲड. सौ. सुमिता भावे, ॲड. विनय आंबुलकर, कार्याध्यक्षा सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, उपकार्याध्यक्ष श्री. शेखर शेट्ये तसेच सर्व कौन्सिल सदस्य, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. स्पृहाला पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
