बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथे झेप उद्योगिनी व MSSIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त “महिला व्यापारी संमेलन व एम.एस.एम.ई. स्टार अवॉर्ड” हा भव्य सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
हा कार्यक्रम केवळ आगळा-वेगळा नव्हे, तर प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण होता. अनेक वेळा महिला कार्यक्रम म्हणजे बचत गटांचा परंपरागत चौकट असतो. मात्र, आज या मंचावर अशा महिला भगिनी उपस्थित होत्या, ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहत आपले स्वतंत्र उद्योग सुरू केलेत. त्या केवळ व्यवसाय करत नाहीत, तर इतरांसाठी आदर्शही निर्माण करत आहेत.
गेल्या काही आठवड्यांपूर्वी भारताने पाकिस्तानला दिलेला चोख प्रत्युत्तर जगभर गाजलं – आणि तेही दोन महिला भगिनींनी प्रभावीपणे जगासमोर मांडलं. हीच महिलांची क्षमता आणि नेतृत्वगुण आज प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. हे संमेलन ही त्याचीच साक्ष आहे.
उद्योगमंत्री म्हणून गेल्या तीन वर्षांत तीन वेळा मी दावोसला गेलो. माझ्या या दौऱ्यांमुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला, याचा मला अभिमान वाटतो, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाला सहकारी मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, शारदाताई जानवलकर, विविध क्षेत्रातील सत्कारमूर्ती उद्योजिका आणि शेकडो महिला उद्योजक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.