बोर्डो पेस्ट तयार करण्याचे व वापराचे प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न—
मांडकी खुर्द, तालुका चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत मांडकी खुर्द येथे “बोर्डो पेस्ट तयार करणे व त्याचा वापर” या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रात्यक्षिकामध्ये बोर्डो पेस्टची योग्य पद्धतीने तयारी, तिचे प्रमाण, वापरण्याची योग्य वेळ, तसेच फळझाडांवरील बुरशीजन्य रोग, खोडावरील जखमा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बोर्डो पेस्टचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बोर्डो पेस्ट तयार करून दाखवण्यात आली तसेच झाडांच्या खोडावर ती योग्य पद्धतीने कशी लावावी याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले.
गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंकांचे निरसन करून घेतले. आधुनिक व शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी अशा प्रात्यक्षिकांची गरज असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम प्रा. बाळा साहेब सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीकन्या उत्कर्षा कांबळे, वैभवी माने, समीक्षा सावंत, अदिती शिर्के आणि करिना कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांमध्ये बोर्डो पेस्टच्या योग्य वापराबाबत जागरूकता निर्माण झाली असून, फळबागांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
