रत्नागिरी, (जिमाका) : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील पोलीस परेड क्रीडांगणावर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी होणार असल्याने सकाळी 8.35 ते 9.35 वाजता या वेळेत त्या दिवशी इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 वाजण्याच्यापूर्वी किंवा 9.35 वाजल्याच्या नंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, पोलीस उपअधिक्षक गृह राधिका फडके आदी उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ अंतर्गत 13,14 व 15 ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांनी, संस्थांनी सहभागी होत तिरंगा फडकवावा. त्यासंदर्भात जिल्हा परिषद, नगरपरिषद , नगरपंचायत यांनी कार्यवाही करावी. त्याबाबतची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करावी. शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, अशा सूचनाही दिल्या.
भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड क्रीडांगणावर मुख्य शासकीय ध्वजारोहण
