मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम
१००% पूर्ण करणारे ‘मौजे टेरव बु.’ महाराष्ट्रातील पहिले गाव!
रत्नागिरी, दि. ८ (जिमाका)- भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – Special Intensive Revision) राबवला जात आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील ‘मौजे टेरव बु.’ या गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपले काम १००% पूर्ण केले असून, हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
या मोहिमेत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या विहित कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी (BLO) घरोघरी भेटी देऊन हे पुनरीक्षण काम अत्यंत अचूकतेने पूर्ण केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली २६५ – चिपळूण विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेसाठी ‘मौजे टेरव बु.’ या गावाची निवड करण्यात आली होती. चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि निवडणूक नायब तहसीलदार रसिका रसाळ यांनी या संपूर्ण कामावर देखरेख ठेवली.
या गावामध्ये एकूण १९५ मतदार असून, यामध्ये ९३ महिला मतदार आणि १०२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान गावातील सर्वच्या सर्व १९५ मतदारांना गणना प्रपत्र (EF) चे वाटप करण्यात आले होते. यापैकी १८७ मतदारांचे गणना प्रपत्र ॲपद्वारे यशस्वीरीत्या डिजिटायझेशन करून ऑनलाइन नोंदवण्यात आले.
या विशेष मोहिमेत तांत्रिक अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी जमा न होण्याजोग्या (Uncollectable) ८ प्रपत्रांचे वर्गीकरण अत्यंत सखोलपणे करण्यात आले. यामध्ये गावातून २ मयत मतदार, ५ दुबार नोंदणी असणारे मतदार आणि १ कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदाराची अचूक माहिती समोर आली असून, त्यानुसार कायदेशीर प्रक्रियेद्वारे मतदार यादी संपूर्णपणे निर्दोष व अद्ययावत करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीत सुप्रिया लोखंडे (तलाठी तथा BLO), आस्माकौसर राजअहमद देसाई (पर्यवेक्षक), नारायण चौधर (मंडळ अधिकारी), मधुरा विश्वनाथ साळवी (अंगणवाडी सेविका), सुहास मोहिते (पोलीस पाटील), शुभम उतेकर (ग्राम महसूल अधिकारी), अनिकेत शिर्के (महसूल सहाय्यक – निवडणूक शाखा) आणि ग्रामपंचायत टेरव बु. यांच्या संपूर्ण पथकाने अहोरात्र मेहनत घेतली. या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून टेरव बु. गावाचे आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे विशेष कौतुक होत आहे.
मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम१००% पूर्ण करणारे ‘मौजे टेरव बु.’ महाराष्ट्रातील पहिले गाव
