महाराष्ट्रमराठी भाषा आणि उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज...

मराठी भाषा आणि उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली

सध्या राज्यात मनसेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली असून, मराठी भाषा वापराबाबत मनसेने मांडलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री डॉ उदय सामंत म्हणाले की, “मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी बँका व इतर संस्थांमधील मराठी भाषेच्या वापराबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार असून, त्या अनुषंगाने काय उपाययोजना करता येतील, याची चर्चा लवकरच केली जाईल.”
असे भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जात असल्या तरी, मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठीचा सन्मान राखणं, हे राज ठाकरे यांचं ही मत आहे आणि तीच आमची भूमिका आहे.”

औद्योगिक क्षेत्रात सक्तीने मराठी लादण्याचा प्रश्न नाकारत, त्यांनी सांगितले की, “जगभरातून येणाऱ्या गुंतवणूकदारांना मराठी शिकण्यासाठी प्रेरणा दिली जाईल, पण सक्ती केली जाणार नाही. मात्र, ज्या संस्था व बँका यांचा थेट संबंध जनतेशी येतो, त्या ठिकाणी मराठीत व्यवहार होणं आवश्यक आहे. या संदर्भात राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही ठरवण्यात येईल.”

राज्यात स्थापन केलेल्या मराठी भाषा संवर्धन समित्यांची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार असून, मराठीचा वापर टाळणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

शेवटी, मंत्री सामंत यांनी सर्व संस्थांना आणि बँकांना आश्वस्त केलं की, “भयमुक्त वातावरणात योग्य मार्गाने चर्चा करून मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी शासन सजग आहे. कोणत्याही संस्थेने घाबरण्याचं कारण नाही. मराठीचा सन्मान राखला गेला पाहिजे यासाठी शासन आग्रही आहे. याबाबत कोणीही कायदा हातात घेऊ नये ही शासनाची भूमिका आहे ”

Breaking News