संगमेश्वर /एजाज पटेल
➖ सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज बोलताना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शैखर निकम यांनी विकास कामांची ठोस मागणी लावून धरली. गृह विभाग, जलसंपदा , पर्यटन, पर्यावरण या विविधांगी विषयांवर चर्चा केली.
➖जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालुन प्रामुख्याने सावर्डे पोलीस स्टेशन अद्यावत इमारत बांधणे. चिपळूण शहरात पावसाळ्यात वारंवार येणारा पूर यावर उपाय योजना म्हणून पुर रोधक प्रकल्पास मंजुरी देणे, वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ उपसा करणे,ब्लु लाईन रेड लाईनचे पुन्हा सर्वेक्षण करणे या बाबतीत ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
➖ जलसंपदा विभागाला उद्देशून तेली वाडी आणि उमरे धरणाची त्वरीत दुरुस्ती करावी व या क्षेत्रातील गावांचे पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्या दृष्टीने विकास कामे लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशी जोरदार मागणी केली.
➖गडगडी नदीवरील लघू प्रकल्प अंतर्गत बंदिस्त पाईप लाईनचा आराखडा मंजूर करावा,व त्यानुसार पाण्याचा अपव्यय टाळून शेतीसाठी मुबलक पाणी देऊन या नदीच्या दोन्ही काठावरील जनसामान्यांचे अर्थकारण मजबूत करण्याचा मुद्दा मांडला.
➖ कोकणातील समृद्ध लोककला आणि तो वारसा जपण्यासाठी अहोरात्र धडपडणारे लोककलावंत ज्यात नमन,खेळे,जाखडी, दशावतार,शंकासूर या लोककलांचा शासकीय सन्मान मिळावा अशीही मागणी निकम सर यांनी केली.
➖ त्याचबरोबर कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण पर्यटन महामंडळ स्थापन करावे ग्रामीण भागातील कृषी पर्यटनास प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून कोकणातील जैवविविधता, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा प्रसिद्धीस येईल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
➖ याव्यतिरिक्त बोलताना निसर्गरम्य कोकणाचा घात करणाऱ्या उद्योगांना चाप बसवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या उद्योगामुळे पाणी प्रदूषित होत असल्याचे सांगत यावर कडक निर्बंध घालून शासकीय धोरण निश्चित करावे आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यांच्या या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
➖ परंतु यानिमित्ताने एकच गोष्ट प्रकर्षाने ध्यानात आणून द्यायची आहे ती अशी की या सर्व समस्यांचा विचार होणे गरजेचे आहे. परंतु संगमेश्वर देवरुख या शहरातील जनसामान्यांच्या प्रश्नांना हात घातल्याचे दिसले नाही.१) शास्त्री ,सप्तलिंगी नदीचा गाळ उपसा
२) संगमेश्वर येथे डोंगरच्या डोंगर खणले जात आहेत यावर चकार शब्द नाही.
३) रेल्वे प्रवाशांची होत असलेली गैरसोय
४) एसटीच्या भोंगळ कारभारावर चकार शब्द नाही
५) प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुरा साधन साठा व रेंगाळलेली कर्मचारी भरती,
६) देवरूख संगमेश्वर येथील गावागावात राजरोसपणे सुरू असलेली अवैध मद्यविक्री
७) रखडलेल्या विकास कामांचे परीक्षण करून संबंधितांवर कारवाई
८) जिल्हा परिषद शाळेला मिळणारे तुटपुंजे अनुदान – व्यवस्थापन तारेवरची कसरत
९) वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान, हिंस्र प्राण्यांचा गावात, शहरात वाढता वावर यावर उपाय योजना.
१०) संगमेश्वर देवरुख येथील ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन जतन. यांसारखे अनेक गंभीर विषय देवरूख संगमेश्वर तालुक्याला भेडसावत आहेत. त्यांचा विचार तातडीने होणे गरजेचे होते.
➖ आमदार महोदयांनी आजच्या सत्रात मांडलेल्या मागण्या या रास्त आहेत पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की संगमेश्वर देवरुख येथे समस्या नाहीत! इथले सार्वजनिक प्रश्न संपले आहेत! विकासकामांची कासवगती पाहून विकास निधीची गळती झाली काय? हा प्रश्न उपस्थित होतो. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
➖ छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पावले उचलली जाणार! मग पर्यटक जेव्हा कोकणात संगमेश्वर येथे येणार त्यांना वाहतूक सुविधा कोणती? आमच्या तालुक्यातील जनतेला कोकण रेल्वेचा जिवघेणा प्रवास करावा लागतो. मग या गर्दीतून संगमेश्वर चिपळूणचे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक गट,कोट पहायला पर्यटक येतील?
➖ देवरुख संगमेश्वर येथे सामाजिक जाण, सामाजिक भान दुरदृष्टी बाळगणारा नेता नाही हे वास्तव असले तरी आमदार महोदयांनी संगमेश्वर देवरुख तालुक्यातील जनतेशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या असत्या तर नक्कीच त्या समस्या विधानसभेत त्यांना मांडता आल्या असत्या. आमदार महोदयांनी संगमेश्वर देवरुखच्याही समस्या विधानसभेत मांडल्या पाहिजेत.अशी जनसामान्यांची माफक अपेक्षा आहे.