संगमेश्वरमाणुसकीचा आदर्श — रिक्षाचालक इब्राहीम खलिफे यांचा राजापूर पोलिसांकडून सत्कार

माणुसकीचा आदर्श — रिक्षाचालक इब्राहीम खलिफे यांचा राजापूर पोलिसांकडून सत्कार

संगमेश्वर : दि. ९ ऑक्टोबर

महामार्गावर लुटीच्या घटनेत जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेला तत्परतेने मदत करून माणुसकीचा सुंदर आदर्श घालणाऱ्या राजापूर शहरातील रिक्षाचालक इब्राहीम खलिफे यांचा राजापूर पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातिर्थ होम रेस्टॉरंटजवळ एक दुर्दैवी घटना घडली. सौ. रश्मी प्रभाकर चव्हाण (वय ६५, रा. कोदवली तरळवाडी, ता. राजापूर) या वयोवृद्ध महिलेला एका अज्ञात कारचालकाने मारहाण करून दुखापत केली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

त्या वेळी योगायोगाने त्या मार्गाने जात असलेले रिक्षाचालक इब्राहीम खलिफे यांनी प्रसंग पाहून तत्काळ आपल्या रिक्षात बसवून त्या महिलेला राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तातडीच्या कृतीमुळे जखमी महिलेला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले.

इब्राहीम खलिफे यांच्या या माणुसकीच्या कृतीची दखल घेत राजापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, आणि उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला.

पोलिसांनी या प्रसंगी सांगितले की, “इब्राहीम खलिफे यांनी दाखवलेली माणुसकीची भावना समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा नागरिकांमुळे समाजात मानवतेचे मूल्य जिवंत राहते”. तसेच महामार्गावर अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी भीती न बाळगता मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली.

Breaking News