मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांना दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील एकूण ४८५ किलोमीटर पैकी तब्बल ४६५ किलोमीटरचे चार पदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबई ते गोवा या महत्त्वाच्या आणि अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील उर्वरित सुमारे २० किलोमीटरचे चार पदरीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण केले जाईल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. या महामार्गाचे संपूर्ण काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.
विशेष म्हणजे, येत्या पावसाळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्णपणे चार पदरी स्वरूपात वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठी संबंधित यंत्रणांना गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई–गोवा महामार्ग पूर्ण झाल्यास कोकणातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
दीर्घकाळ रखडलेल्या या महामार्गाच्या कामामुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजी कमी होण्याची शक्यता असून, जून २०२६ ही तारीख आता तरी अंतिम असेल असे समजून घेऊ या..
