चिपळूणमुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत सावर्डे विद्यालयात सेंद्रिय परसबागेची यशस्वी निर्मिती

मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत सावर्डे विद्यालयात सेंद्रिय परसबागेची यशस्वी निर्मिती

सावर्डे (ता. चिपळूण) – सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे या विद्यालयाने मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानात सहभाग नोंदवित शाळा परिसरात सेंद्रिय परसबागेची यशस्वी निर्मिती केली आहे.
प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती योजनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात ताज्या व पौष्टिक भाज्यांचा समावेश व्हावा, तसेच परसबाग विकासाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
श्रमप्रतिष्ठा व विद्यार्थ्यांचे मातीशी नाते या मूल्यांवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिला. जमिनीचे सपाटीकरण, मशागत, सरी-वरंबे व गादीवाफे तयार करणे, रोपांची लागवड, सेंद्रिय खतांचा वापर, रोपांचे संवर्धन व संरक्षणासाठी हिरव्या जाळीदार कुंपणाची उभारणी अशी सर्व कामे विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाखाली केली.
परसबागेत सरी-वरंब्यावर वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो, गवारी आदी फळभाज्या तर गादीवाफ्यांवर मुळा, मेथी, कोथिंबीर तसेच दोडका, काकडी, कारले यांसारख्या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यात आली आहे.
परसबागेसाठी आवश्यक खतांची निर्मितीही विद्यालयातच करण्यात आली आहे. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तसेच जीवामृत यांची निर्मिती करून पूर्णतः सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्यात आला. देशी गाईचे शेण, गोमूत्र, गूळ व बेसन पीठ यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून आठ दिवसांत तयार झालेले जीवामृत भाज्यांसाठी वापरण्यात आले.
रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खत व उपायांचा अवलंब करत ही परसबाग मुख्याध्यापक श्री. राजेंद्रकुमार वारे व उपमुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक शेती, आरोग्यदायी आहार व श्रमाचे महत्त्व याबाबत जागृती निर्माण झाली असून विद्यालयाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Breaking News