रत्नागिरीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

सरपंचांची ताकद विधायकदृष्ट्या वापरली तर, सगळीच्या सगळी बक्षीसं आपणाला -पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, (जिमाका) : आपला जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. त्यांची संस्कृती जपून आणि त्यांचा विचार पुढे देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. ग्रामसभा या विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. गावचा सरपंच गावचा मुख्यमंत्री असतो. सरपंचाची ताकद त्यांनी विधायकदृष्ट्या जर वापरली, अख्या गावाला घेऊन जर काम केलं, तर सगळीच्या सगळी बक्षीसं आपण मिळवू शकतो. आपल्या जिल्ह्याचा सर्वांकडून विकास झाला पाहिजे. आपल्या जिल्ह्याकडे आदर्श म्हणून महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे, त्यासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवनमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जर अजून काही गावे महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर आणायची असतील, तर स्वच्छता असणं गरजेचं आहे. तिथे 50 – 50 घरांमध्ये न्याहरी निवास योजनेचे काम सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे. आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे. हे अभियान शंभर दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने दाखवायचे असेल, तर या सरपंचांबरोबर, ग्रामसेवकांबरोबर अधिकारी देखील असणे गरजेचे आहे. आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी जर कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्ये देखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये जर कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडतं. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा रत्नागिरी आहे की डीपीसीच्या फंडातून घनकचऱ्याच्या गाड्या दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये होणारा जो कचरा आहे, तो चांगल्या पद्धतीने तुम्ही जमा केला पाहिजे. त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. स्वच्छ वातावरणामध्ये निर्मळ वातावरणामध्ये आपला गाव ठेवला पाहिजे.
आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाजाप्रती आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, या भावनेतून सरपंचांनी, ग्रामपंचायत सदस्यांनीदेखील या अभियानात काम करावे. संधी तुम्हाला चालून आली आहे. हे 100 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. कोण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे, कोण जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, ते सगळे लोक लक्षात ठेवतात आणि अशा अभियानाच्या माध्यमातून जर सरपंच घराघरापर्यंत पोहोचले, ग्रामपंचायत सदस्य घराघरात पोहचले तर तुमचं देखील राजकीय अस्तित्व राहणार आहे. हा कार्यक्रम आपण घराघरापर्यंत पोहचवला पाहिजे.
सगळ्या परंपरा आणि संस्कार असणारा रत्नागिरी जिल्हा परीक्षेमध्ये पुढे असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेतला पट कमी का होतोय, हा देखील विचार शंभर दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी करायला हवा. दामले विद्यालय पहिलीमध्ये जर 160 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकते तर ग्रामीण भागातली शाळा 60 विद्यार्थ्यांना का देऊ शकत नाही, याचे आत्मचिंतन आपण केलं पाहिजे.
आपल्या जिल्ह्यामध्ये 99.99% शिक्षक चांगले असल्यामुळेच कोकण बोर्डामध्ये आपला एक नंबर येतो. त्याच्यामध्ये शिक्षकांना कुठेही कमी लेखण्याचं काम नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी स्वागत प्रास्ताविकामध्ये अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी आभार मानले. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यशाळेस सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...