रत्नागिरीरत्नागिरीत शासकीय रुग्णालयात लाळ ग्रंथीवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

रत्नागिरीत शासकीय रुग्णालयात लाळ ग्रंथीवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

ज्येष्ठ महिलेला मिळाले नवजीवन- तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याचा उत्कृष्ट नमुना
रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे लाळ ग्रंथीवरील (Salivary Gland) अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून एका ज्येष्ठ महिलेचे जीवन वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवेच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीमती रुक्मिणी विठ्ठल रांबाडे (वय ७० वर्षे) यांच्या चेहऱ्यावर ट्युमरची मोठी गाठ निर्माण झाली होती. वयोमानामुळे त्यांना हृदयविकाराचाही त्रास असल्याने शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. तसेच ही गाठ पुढे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे रूप धारण करण्याची शक्यता होती. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून गाठ काढणे आवश्यक होते.
कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनिता बागे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने सुपरफिशियल पॅरोटिडेक्टॉमी (Superficial Parotidectomy) ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. चेहऱ्याच्या अतिशय संवेदनशील फेशियल नर्व्ह (Facial Nerve) ला कोणतीही इजा न होऊ देता ट्युमर काढण्यात आल्यामुळे रुग्णाला चेहऱ्याचा लकवा येण्याचा संभाव्य धोका टळला.
या शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. जमशेर शेख व डॉ. प्रियांका साळुंखे यांनी संपूर्ण प्रक्रियेत रुग्णाची विशेष दक्षता घेतली. तसेच ऑपरेशन थिएटरमधील नर्सिंग स्टाफ आणि विशेषत: स्टाफ नर्स भावना यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एवढ्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीरित्या पार पडल्याने ही बाब विशेष अभिमानाची ठरली आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात हजारो ते लाखो रुपयांचा खर्च येण्याची शक्यता असते; मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे ही शस्त्रक्रिया रुग्णाकडून एकही रुपया न घेता पूर्णपणे मोफत करण्यात आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल मा. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांनीही अभिनंदन करताना सांगितले की, रुग्णालयात अनुभवी ENT शल्यचिकित्सक उपलब्ध असल्यामुळे जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील डॉक्टर, तज्ज्ञ व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडून रुग्णाला नवजीवन मिळाले आहे, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. -डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी

Breaking News

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी,  (जिमाका) :- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार...