महाराष्ट्रराजकारणापलीकडील मार्गदर्शक :- आदरणीय शरद पवार साहेब

राजकारणापलीकडील मार्गदर्शक :- आदरणीय शरद पवार साहेब

महाराष्ट्राच्या राजकारणाला स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पासून आजपर्यंत एक वेगळी संस्कृती प्राप्त आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला संपूर्ण देशामध्ये सुसंस्कृत राजकारण्यांचं राज्य म्हणून पाहिलं जातं. ह्या महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाच्या पुस्तकातील एक सुवर्ण पान म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब!
मा. शरद पवार साहेबांबद्दल महाराष्ट्रातच नाही तर देशाभरात राजकारणी असोत वा सर्वसामान्य जनता असो ते एका वेगळ्या आदरानेच बघतात. त्याचे कारण म्हणजे पवार साहेबांची प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आणि सामान्य जनतेसाठी असलेली आस्था ! एकदा ओळख झालेल्या व्यक्तीला मा. पवार साहेब सहसा कधी विसरत नाहीत हे त्यांच्या ८५ व्या वाढदिवशी देखील असलेलं वैशिष्टय !
मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करताना मला मा. पवार साहेबांनी महाराष्ट्राची विधानसभा दाखवली, हे आदरपूर्ण नमूद करण्यास मी कधीच विसरणार नाही. मा. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखे असंख्य तरुण घडले. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये मा. पवार साहेबांनी देशभरात अनेकांना मार्गदर्शन करत घडवले. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यामध्ये मा. पवार साहेबांनी ह्या राज्याच भविष्य पाहिलं आणि मला त्यांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची त्यांनी संधी दिली हे मी कधीच विसरलो नाही. कालांतराने मी जरी माझी राजकीय वाट बदलली असली तरी देखील आजपर्यंत मा. पवार साहेबांनी माझ्यावरील त्यांचे असलेले प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही आणि मी देखील आज पण मा. पवार साहेबांबद्दल तेवढाच आदर बाळगून त्यांचा सल्ला, मार्गदर्शन घेऊन जनतेची सेवा करत आलो आहे. आज आमचे पक्ष भिन्न असले तरी देखील वेगवेगळ्या संस्थांच्या समित्यांवर मला मा. पवार साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळते. त्यावेळी देखील त्यांचे मार्गदर्शन नेहमीप्रमाणे मोलाचेच ठरते. आज देखील त्यांचे मार्गदर्शन घेताना मला मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच करतोय असा भास होत असतो, एवढे मा. पवार साहेब अनुभव बाळगून आहेत.
आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या बद्दलच्या भावना विशेष नमूद कराव्या असे वाटले, म्हणून हा छोटासा प्रयत्न करतोय.

आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा ! त्यांना उत्तम व दीर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना! राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी म्हटल्याप्रमाणेच आदरणीय पवार साहेबांनी वयाच्या “सेंच्युरी” पर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत राहवे, हिच सदिच्छा !

उदय सामंत मंत्री उद्योग तथा मराठी भाषा व पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा

Breaking News