मंडणगडरायगडावर नवा वाद ! वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून इतिहासतज्ज्ञ आमनेसामने--

रायगडावर नवा वाद ! वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून इतिहासतज्ज्ञ आमनेसामने–

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचा ऐतिहासिक उल्लेख नसल्याचे सांगत तो पुतळा ३१ मेपूर्वी हटवावा, अशी मागणी केली.* त्यांच्या या मागणीला काही इतिहास अभ्यासकांनी पाठिंबा दिला असला, तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर विरोधही होत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी, वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा केवळ राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून आलेला असून, त्याचा कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे सांगितले. त्यामुळे रायगडाच्या पवित्र परिसरात ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या गोष्टींना स्थान देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर देत, वाघ्या कुत्र्याचा उल्लेख ऐतिहासिक पुराव्यांमध्ये असल्याचा दावा केला आहे. शिवाय, अनेक शिल्पांमध्ये वाघ्या कुत्रा शिवाजी महाराजांसोबत दाखवला गेला आहे. त्यामुळे हा इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, असे ते म्हणाले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, या मागणीमागे काही विशिष्ट हेतू असू शकतात आणि नागरिकांनी इतिहासाचा सखोल अभ्यास करूनच यावर मत बनवावे.
वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीला धनगर समाज आणि होळकर घराण्यानेही कडाडून विरोध केला आहे. हा त्यांच्या परंपरेचा आणि इतिहासाचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संजय सोनवणी यांनीही यावर भाष्य करत, “जर हा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला गेला, तर आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. यापूर्वीही या विषयावर आम्ही आंदोलन केले आहे,” असे सांगितले.या संपूर्ण वादाला आता राजकीय स्वरूप येण्याची शक्यता आहे. काही संघटना आणि शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेत संभाजीराजे छत्रपती यांनी इतिहास समजून घेतल्यानंतरच अशी मागणी करावी, असा सल्ला दिला आहे. तर, काही मंडळींनी संभाजीराजे यांच्या भूमिकेचे समर्थन करत, रायगड परिसरात केवळ खऱ्या ऐतिहासिक वारशालाच स्थान द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.
रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा गड मानला जातो. त्यामुळे या वादाला वेगवेगळे पैलू मिळत असून, भविष्यात हा विषय न्यायालयात जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ३१ मे ही अंतिम मुदत असल्याने पुढील काही दिवसांत हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत. यावर राज्य सरकार, इतिहासतज्ज्ञ, आणि शिवप्रेमींची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...