सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे दिनांक २२ डिसेंबर रोजी थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजेंद्र वारे यांनी रामानुजन यांनी अल्पायुष्यात केलेल्या गणितातील अमूल्य कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांचे गणिती विचार विकसित व्हावेत, यासाठी पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता नववी ‘ब’ मधील विद्यार्थ्यांनी केले होते. कुमारी दीप्ती लिबे हिने प्रभावी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी मनोगतामध्ये श्रावणी राठोड व कृष्णाली खापरे या विद्यार्थिनींनी रामानुजन यांच्या गणितीय कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा सादर केला.
शिक्षक मनोगतात विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. संचिता कदम यांनी रामानुजन यांनी सिद्ध केलेल्या विविध गणितीय संकल्पनांची माहिती दिली. त्यांनी रामानुजन जादुई चौरस, सलग पूर्णांक मालिका, वर्तुळातील परीघ व व्यासाचे सूत्र तसेच π (पाय) चे मूल्य यांसारखी उदाहरणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी निधी पडवळकर हिने आभार प्रदर्शन केले. यानिमित्ताने श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तिपत्रक तयार करण्यात आले होते. या भित्तिपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अशोक शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील गणित शिक्षक मनोज कुलकर्णी, अविनाश पोतदार, सौ. संचिता कदम, प्रियांका व्यवहारे यांनी विशेष सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास निश्चितच चालना मिळाली.
