महाराष्ट्रवर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल इंटरटेनमेंट समिटच्या तयारीचा डॉ. उदय सामंतांनी घेतला आढावा

वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल इंटरटेनमेंट समिटच्या तयारीचा डॉ. उदय सामंतांनी घेतला आढावा

१ मे रोजी मुंबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल इंटरटेनमेंट समिट अर्थात Waves चे मुंबईत भव्य आयोजन करण्यात आले आहे. १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी परिषदेच्या ठिकाणी जाऊन आढावा बैठक घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणारा पहिला जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन समिट साठी केंद्र सरकारनं महाराष्ट्राची निवड केली. मुंबईतल्या बीकेसी इथं जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे ही समिट होणार आहे. १ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या समिटचे उद्घाटन होणार आहे. यावेळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, रेल्वे, माहिती-प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स-माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर, हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर (बॉलीवूड) तसेच मराठी चित्रपटांची निर्मितीही याच महाराष्ट्रात दादासाहेब फाळकेंनी सुरु केली. एकूणच मनोरंजनाच्या क्षेत्रात देशातले अग्रगण्य शहर म्हणजे मुंबई आहे. त्यामुळेच मुंबईत ही समिट घेतल्याचे डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. मागील ३ वर्षात मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. अशाप्रकारची विक्रमी गुंतवणूक आणून महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्र हा पर्यटन क्षेत्रातही आता अन्य देशांशी स्पर्धा करतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र जागतिक पातळीवर पोहोचविणे, हा देखील या समिटचा उद्देश असल्याचे डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती, औद्योगिक संस्कृती, परंपरा जागतिक स्तरावर गेली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राची निवड केली आहे. या समिटमध्ये ३३ देशातील मंत्री आणि मंत्रीदर्जाची लोकं उपस्थित राहणार आहेत. जगभरातल्या १२० कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चित्रपट, उद्योग, पर्यटन क्षेत्रातील नामवंत या समिटमध्ये सहभागी होणार आहेत. शिवाय बॉलीवूड, टॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतले सेलिब्रेटींसोबतच चित्रपट निर्मातेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.

या समिटमध्ये भारत, महाराष्ट्र, तेलंगाणा, नेटफ्लिक्स, अमेझॉन, मनोरंजन आणि उदयोगक्षेत्रातील दालने असतील. या दालनांचे उद्घाटन १ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या समिटच्या नियोजनाची जय्यत तयारी झाली आहे, त्यात उद्योग आणि सांस्कृति विभागाचा खारीचा वाटा असल्याचे डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर सहभागी झालेल्या विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत राऊंड टेबल बैठका होतील. या बैठकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र सरकारमधील मंत्री सहभागी होणार आहेत. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झालेल्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत राऊंड टेबल बैठका घेतील. तिसऱ्या दिवशीही बैठका, परिसंवाद आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतील. समिटच्या चौथ्या दिवशी नवी मुंबईतील डॉ. डी.वाय.पाटील मैदानावर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विख्यात संगीतकार ए.आर.रहमान उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.

समिटमध्ये सहभागी झालेल्या शिष्टमंडळांना भारतीय बनावटीची वाहने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. ३ आणि ४ मे रोजी नोंदणी करून अधिकाऱ्यांचाही खुला संवाद ठेवण्याचा विचार आढावा बैठकीत करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. २ मे रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्रकार परिषद होईल, त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र काय निर्णय घेणार आहे, याविषयी माहिती देण्यात येईल, अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.

Breaking News