सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्थेचे गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सेवासाधना प्रतिष्ठान, केतकी यांच्या सहकार्याने ‘विज्ञानाचा अद्भुत प्रवास’ या विषयावर प्रेरणादायी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध व्याख्याते विनीत वाघे यांनी ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचा इतिहास, आधुनिक भौतिकशास्त्र, विविध शोध, तसेच शास्त्रज्ञांचे कार्य प्रेरणादायी उदाहरणांसह उलगडून सांगितले. चित्रफितीच्या माध्यमातून घेतलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी व्याख्याते वाघे यांचे स्वागत करून सेवासाधना प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विज्ञान, गणित, संगणक, भूगोल, इतिहास यांचा परस्परसंबंध विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा व शास्त्रज्ञानातून भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. “एखादे काम आवडीने आणि प्रामाणिकपणे केले तर यश समीप येते,” असा संदेश विनीत वाघे यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना दिला.
खडक व जीवाश्मांचे अनोखे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र
या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण म्हणून ५० पेक्षा अधिक प्रकारचे खडक व काही दुर्मीळ जीवाश्मांचे प्रदर्शन भरविण्यात आले. काही जीवाश्म तब्बल ६० दशलक्ष वर्षे जुने असून विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळाली.
तसेच महाराष्ट्राच्या भूगोल व इतिहासाचा 3D नकाशाद्वारे प्रभावी आढावा विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आला.
उत्क्रांती व पर्यावरणावर विशेष सादरीकरण
बिग बँगपासून पृथ्वीचा जन्म, ताऱ्यांची निर्मिती, जीवनाची उत्पत्ती आणि मानव उत्क्रांतीपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी रंजक पद्धतीने अनुभवला. विज्ञान-तंत्रज्ञानाचा मानव जीवनावर होणारा प्रभाव आणि पर्यावरणावरील परिणाम याबाबत चिंतन घडविण्यात आले.
या उपक्रमात उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. विज्ञानाची रुची व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारा हा उपक्रम यशस्वी ठरला.
