रत्नागिरीविधानभवनात बोगस पासचा सुळसुळाट- २ ते ५ हजार रुपयांत प्रवेश ? मंत्री...

विधानभवनात बोगस पासचा सुळसुळाट- २ ते ५ हजार रुपयांत प्रवेश ? मंत्री उदय सामंतांची थेट सभापतींकडे तक्रार

विधानभवनात बोगस पासचा सुळसुळाट- २ ते ५ हजार रुपयांत प्रवेश ? मंत्री उदय सामंतांची थेट सभापतींकडे तक्रार-
मुंबई विधानभवन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या ई-मेलनंतर येथील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. प्रवेशाचे नियम अत्यंत काटेकोर करण्यात आले असतानाच, चक्क पैशांची देवाणघेवाण करून बोगस प्रवेशपत्रे वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार विधानसभा अधिवेशनात उघडकीस आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या गंभीर प्रकरणाला सभागृहात वाचा फोडली असून त्यांनी थेट सभापती राम शिंदे यांच्याकडे या प्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी (MIDC) विभागाच्या लेटरहेडची हुबेहूब रंगीत झेरॉक्स काढून त्यावर अधिकाऱ्यांची खोटी नावे आणि बनावट सह्या करून हे प्रवेश पास देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, विधान भवनातीलच काही शिपायांनी २००० ते ५००० रुपये घेऊन तब्बल ५० पास अशा बेकायदेशीर पद्धतीने वाटले आहेत. खुद्द उदय सामंत यांनीच ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत, सभापती राम शिंदे यांनी त्वरित एक चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणातील दोषींवर अधिवेशन संपेपर्यंत अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय, एसआयडीसीच्या अहवालानंतर यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी दिली.
दुसरीकडे, आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विटद्वारे या प्रवेशपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. अत्यंत कडक सुरक्षा असतानाही काही विशिष्ट संघटनांचे कार्यकर्ते आत कसे आले? त्यांनी एका दालनात यथेच्छ जेवण कसे केले? आणि विधीमंडळ परिसरात विशिष्ट पुस्तकांचे वाटप कसे केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना हे सर्व प्रकार कोणाच्या जबाबदारीवर होत आहेत, असा रोखठोक प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
अवघ्या तीन दिवसांपूर्वी मुंबई विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर बॉम्बची धमकी देणारा एक निनावी ई-मेल आला होता. पोलिसांनी तातडीने सर्च ऑपरेशन राबवले, जे नंतर केवळ एक अफवा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार, मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचे निर्देश दिले होते. इतके कडक नियम असूनही बनावट लेटरपॅडचा वापर करून थेट विधानभवनातच बोगस पासचा बाजार मांडल्याने सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पत्रकाराचे मत: लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात सुरक्षेचे असे धिंडवडे निघणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पैशांसाठी जर विधानभवनाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जात असेल, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्नच उरत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर लवकरात लवकर आणि कठोर कारवाई होणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे

Breaking News

रत्नागिरी भूषण भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याजवळ तातडीने प्रकाश व्यवस्था करावी

रत्नागिरी भूषण भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याजवळ तातडीने प्रकाश व्यवस्था...

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बेर्डेवाडी कालव्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बेर्डेवाडी कालव्यासाठी...