रत्नागिरी, दि.६ (जिमाका)- विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जनकल्याण यात्रा 2025 चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोबाईल एलईडी व्हॅनमार्फत करण्यात येत आहे. या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाला.
यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. विशेष सहाय्यक विभागाच्या योजनांवर आधारित दिग्दर्शक व निर्माता शंकर बारवे यांनी तयार केलेला माहितीपट मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर योजनेची माहितीपत्रके लाभार्थ्यांना देऊन योजनेची माहिती दिली जाणार आहे.
विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टल द्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन लघुपटामधून अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 15 गावांमध्ये व शहरात जनजागृती करण्यात येणार आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्यात येणार आहे.
या माहितीपटाद्वारे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री श्री.झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, “आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार या सर्वांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबवत आहे. या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या हातात मिळावी, यासाठी डी.बी.टी. पोर्टल द्वारे त्यांना त्यांची विशेष सहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतून भ्रष्टाचार, दिरंगाई थांबली आहे. समाजातील गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून सदर योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा.”
विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यात आजपासून जनकल्याण यात्राअपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते शुभारंभ–
