शिमग्याला बोटीने गाठता येणार गाव!
‘एम टू एम’ फेरी सेवेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई :- शिमगोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी शिमग्याला कोकणी माणसाला थेट समुद्रातून बोटीने गावी जाता येणार आहे. १ मार्चपासून मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग अशी ‘एम टू एम’ फेरी सेवा सुरू होत असून, याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि रेल्वेच्या गर्दीतून सुटका करण्यासाठी सरकारने हा जलद मार्ग उपलब्ध करून दिला आहे. मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर या फेरीमुळे अवघ्या सात तासांत पार करता येईल. या उपक्रमाची घोषणा करताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, १ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या प्रवासात ते स्वतःदेखील बोटीने प्रवास करणार आहेत.
असे असेल फेरीचे वेळापत्रक
प्रवाशांच्या सोयीसाठी १ मार्च ते ८ मार्च दरम्यानचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
१ मार्च: भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.
२ मार्च: विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
मुंबई ते विजयदुर्गः ही फेरी सकाळी ८:०० वाजता मुंबईहून निघेल आणि दुपारी ३:०० वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. मार्च महिन्यात १, ४, ७, ११, १४, १८, २१ आणि २५ तारखेला ही सेवा उपलब्ध असेल.
विजयदुर्ग ते मुंबईः परतीचा प्रवास दुपारी १२:०० वाजता विजयदुर्ग येथून सुरू होईल आणि संध्याकाळी ७:०० वाजता फेरी मुंबईत पोहोचेल. ही सेवा मार्च महिन्यात २, ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ तारखेला असेल.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचनाः
अहवाल वेळ : सर्व प्रवाशांनी फेरी सुटण्याच्या किमान ९० मिनिटे आधी टर्मिनलवर पोहोचणे अनिवार्य आहे. चेक-इनः विजयदुर्ग आणि मुंबई प्रवासासाठी चेक-इन काउंटर निर्धारित वेळेच्या ३० मिनिटे आधी बंद होतील. जहाजावर प्रवाशांच्या खानपानासाठी ‘मीमोज कॅफे’ ची सोय करण्यात आली आहे.
दक्षिण आशियातील ही सर्वात वेगवान रो-रो फेरी सेवा मानली जात आहे.
