संगमेश्वर रेल्वे स्थानक येथे घाणीचा साम्राज्य, प्रवाशांच्या जीवाशी रेल्वे प्रशासनाचा खेळ?
संगमेश्वर शहर /एजाज पटेल
संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत कचऱ्याचे ढिग अक्षरशः सडत पडले आहेत आणि त्या ढिगांतून उठणारी दुर्गंधी संपूर्ण परिसर व्यापत आहे. डासांचे थवे फिरताना दिसत असून प्रवाशांना चावण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रोगराईला निमंत्रण देणारी ही परिस्थिती पाहता, “रेल्वे प्रशासन झोपले आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अशीच अवस्था होती. प्रसारमाध्यमांनी छायाचित्रे व व्हिडिओ प्रसिद्ध करताच प्रशासनाने धावपळ करून साफसफाई केली. मात्र, ती कारवाई केवळ दिखाऊ होती का? कारण आज पुन्हा तोच प्रकार सुरू आहे. घाण साचते, डास वाढतात, बातमी होते आणि काही तासांत स्वच्छता,नंतर पुन्हा जैसे थे! हा नेमका कोणता “स्वच्छता” नमुना?
एकीकडे शासन “स्वच्छता राखा, रोगराई टाळा”चे फलक लावून जनतेला उपदेश करत आहे; दुसरीकडे त्याच शासनाच्या अखत्यारीतील स्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य उभे राहत आहे. जनजागृतीसाठी कोट्यवधींचा खर्च आणि प्रत्यक्षात शून्य अंमलबजावणी हा दुटप्पीपणा नाही तर काय?
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, वाढत्या उकाड्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? “प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवा,” अशी मागणी आता जोर धरत आहे.
स्थानक परिसरातील स्वच्छतेवर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी आणि गरज भासल्यास त्यांच्या तात्काळ बदलीचा निर्णय घ्यावा, अशी चर्चा नागरिकांतून जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांनी नियमित कचरा व्यवस्थापनाची ठोस यंत्रणा उभी करावी, डास नियंत्रणासाठी सातत्याने फवारणी करावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. आता प्रशासन ठोस पावले उचलणार की पुन्हा एकदा केवळ तात्पुरती साफसफाई करून विषय झाकला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संगमेश्वर रेल्वे स्थानकातील ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणाचे उदाहरण नसून, प्रशासनाच्या उदासीनतेचा जाहीर नमुना असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये रंगत आहे. आता वरिष्ठ अधिकारी जागे होणार का, की पुन्हा एखादा व्हिडिओ व्हायरल होण्याची वाट पाहणार?
