सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे यांच्या वतीने शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहास जपण्याचा, पर्यावरण संवर्धनाचा आणि प्लास्टिक मुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला. प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तूंचे जतन, स्वच्छता आणि राष्ट्रभक्तीचे महत्त्व अनुभवातून जाणून घेतले.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ‘रत्नागिरी दर्शन’ शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये कसबा येथील कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, भगवती किल्ला व तेथील मंदिरे तसेच गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिर या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.
या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, ऐतिहासिक वारशाचे महत्त्व, तसेच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. गणपतीपुळे मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या गोळा करून परिसराची स्वच्छता केली. या कृतीतून ‘प्लास्टिक मुक्ती’चा संदेश प्रत्यक्ष कृतीद्वारे देण्यात आला. ऐतिहासिक वास्तू व धार्मिक स्थळे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यात आले.
या शैक्षणिक सहलीमध्ये सुमारे शंभर विद्यार्थी आणि आठ शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण यांचे महत्त्व समजून घेत आनंददायी आणि ज्ञानवर्धक अनुभव घेतला.
या उपक्रमाचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली , सहाय्यक शिक्षिका समृद्धी कदम व सकाळ सत्राच्या सर्व शिक्षकांनी या सहलीचे नेटके आयोजन केले त्यांनी अशा शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, अनुभवातून शिक्षण मिळते आणि सामाजिक जाणीव निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी केवळ पर्यटन न राहता इतिहासाचे जतन, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
