रत्नागिरीसावर्डे विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलनाचे दिले धडे--

सावर्डे विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलनाचे दिले धडे–


अंधश्रद्धेला दूर करा विज्ञानाची कास धरा – रविंद्र खानविलकर—
सावर्डे- भारतातील सर्वसामान्य लोकांच्या मध्ये असणारे अज्ञान, ताबडतोब श्रीमंत होण्याची लालसा व मानसिकता या बाबींचा गैरफायदा उचलून आज समाजामध्ये अनेक भोंदूगिरी करणारे लोक आढळून येतात व सर्वसामन्यावर अन्याय करतात.श्रद्धा असावी मात्र ती अंध नसावी कारण फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे प्रत्येक प्रात्यक्षिक हे विज्ञानावर अवलंबून असते. म्हणूनच युवापिढीने या भोंदू बाबांच्या शोषणाविरुद्ध लढा देऊन सर्वसामान्य माणसांची सुटका केली पाहिजे व सर्व सामान्यांच्या मध्ये तार्किक विचार करण्याची जागृती करणे आवश्यक आहे. असे आवाहन श्री.रवींद्र खानविलकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच कोकण विभाग आयोजित अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्काराच्या प्रात्यक्षिकांसह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र खानविलकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष जगन्नाथ साबळे व चिपळूण तालुका अध्यक्ष सचिन तांबे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात रविंद्र खानविलकर यांनी आजची सामाजिक स्थिती व त्याचा गैरफायदा घेऊन समाजाला फसवणाऱ्या भोंदू बाबांचे जीवन व त्यांच्या विविध क्लुप्त्या कशा मारक आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना उदाहरणासह दिली. कारण त्यांच्यामध्ये भूत भानामती करणी मूठ विज्ञान सांगते सारे झूट असे असून भोंदू बाबांच्या प्रत्येक प्रात्यक्षिका पाठीमागे विज्ञानाचे अधिष्ठान आहे हे त्यांनी पटवून दिले.विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, सामाजिक स्थितीची माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी जगन्नाथ साबळे यांनी स्क्रू ड्रायव्हर च्या साह्याने एखादा तांब्या कसा उचलता येतो त्याचबरोबर विज्ञानाच्या संयुगांच्या मदतीने ज्वाला कशी पेटविता येते याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थी सहभागाच्या माध्यमातून या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सहकार्य करून सहभाग नोंदवला व आपल्या मनोगतात नक्कीच सर्वसामान्य लोकांना फसवले जाते आणि तेही विज्ञानाच्या सहकार्याने याची कल्पना आम्हाला प्राप्त झालेली असून लोकांच्या शोषणा विरुद्ध आम्ही जागृत राहू व वाईट कृती पासून सर्वांनाच परावृत्त करू अशी ग्वाही दिली. या व्याख्याना प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून प्रात्यक्षिकांचा मतितार्थ समजावून घेतला व त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक शंकांचे निरसन समन्वयकांच्या माध्यमातून करून घेतले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीकोनातून हे व्याख्यान अतिशय उत्कृष्ट असून अंधश्रद्धेच्या विरोधात मुलांच्या माध्यमातून नक्कीच जागृती केली जाईल व एक सामाजिक बाब म्हणून याकडे सर्वजण दक्षतेने लक्ष देतील अशी ग्वाही दिली.शेवटी निवेदक अमित साळवी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Breaking News