रत्नागिरीसावर्डे विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे आयोजन

सावर्डे विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे आयोजन

अंधश्रद्धा टाळा, तर्कशुद्ध विचार करा – रोहित गमरे
सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात व्याख्याते रोहित गमरे यांनी अंधश्रद्धा व तथाकथित चमत्कारांमागील विज्ञान अतिशय सोप्या व समजण्यासारख्या पद्धतीने स्पष्ट केले. त्यांनी नारळातून दोरा काढणे, नारळातून लाल पाणी काढणे अशी प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच धुण्याचा सोडा (वॉशिंग सोडा) वापरून रासायनिक क्रियेमुळे लाल पाणी कसे बाहेर येते, हे प्रत्यक्ष प्रयोगातून समजावून सांगितले.
या प्रात्यक्षिकांमुळे अनेकदा चमत्कार म्हणून मांडल्या जाणाऱ्या घटना प्रत्यक्षात विज्ञानावर आधारित असतात, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारून प्रयोगांचे शास्त्रीय स्पष्टीकरण समजून घेतले. अशा उपक्रमांमुळे अंधश्रद्धांऐवजी तर्कशुद्ध व वैज्ञानिक विचार स्वीकारण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.
कार्यक्रमाला शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी साक्षी गोरे हिने प्रभावीपणे केले. हा उपक्रम विज्ञान विषय समूहांतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी विज्ञान विषय समूहातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News