रत्नागिरीसावर्डे विद्यालयात कलाविष्कार सादर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकसित करणारे व्यासपीठ-- पूजाताई निकम

सावर्डे विद्यालयात कलाविष्कार सादर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकसित करणारे व्यासपीठ– पूजाताई निकम

सावर्डे – अध्ययन, संस्कार व कलाविष्कार या त्रिवेणीच्या संगमातून शालेय जीवन फुलत असून व्यक्तिमत्त्व विकासासाठी सांस्कृतिक उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा, असे आवाहन सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. पूजाताई निकम यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित ‘जल्लोष’ या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असल्याचे पूजाताई निकम यांनी यावेळी नमूद केले.

कनिष्ठ विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक प्रशांत जी निकम यांनी व माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वस्त शांताराम खानविलकर यांनी श्रीफळ वाढवून केले.या कार्यक्रमास संस्थेचे संचालक शांताराम खानविलकर,उद्योजक प्रशांतजी निकम,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा पूजाताई निकम,सरपंच समीक्षा बागवे, हॉलीबॉलपटू मुराद खलपे, बाबा कोकाटे,सलीम मोडक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पालकांचेही उत्तम सहकार्य लाभले.

‘जल्लोष’ या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकधारा साकारत कथ्थक, शेतकरी गीत, लावणी, आदिवासी नृत्य, भारुड, कोळी नृत्य, जोगवा, रेकॉर्ड डान्स, नाटिका तसेच राष्ट्रभक्तीपर गीत अशा विविध आणि रंगतदार कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन कौशल्य विकास करावा व सुज्ञ नागरिक बनावे असे आवाहन उद्योजक प्रशांतजी निकम यांनी याप्रसंगी केले. तर विश्वस्त शांताराम खानविलकर यांनी विद्यालयाने दर्जेदार शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे एक नामांकित शाळा म्हणून शाळेसह संस्थेचाही नावलौकिक वाढविला आहे याबद्दल विद्यालयाचे कौतुक केले.

याप्रसंगी विविध उपक्रमांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनातील या सांस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभल्याने संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सौ. पूजाताई निकम व विश्वस्त शांताराम खानविलकर, तर रंगमंचावर विविध कलाविष्कार सादर करताना विद्यार्थी असे प्रेरणादायी दृश्य स्नेहसंमेलनात पाहायला मिळाले.

Breaking News