सावर्डे (ता. चिपळूण) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
“प्रजेच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे राजे”
यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचे लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. अनेक संकटे, जीवघेणे संघर्ष आले तरी ते कधीही हतबल झाले नाहीत. वैयक्तिक शौर्य, संघटन कौशल्य, उत्तम प्रशासन आणि सर्वधर्मसमभाव या गुणांमुळे ते आजही प्रेरणादायी आहेत.”
भित्तीपत्रकाचे आकर्षण
शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचे आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेतील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे सचित्र भित्तीपत्रक सुधीर कदम व रोहित गमरे यांनी तयार केले होते. या भित्तीपत्रकाचे उद्घाटन सहाय्यक शिक्षक अशोक शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थी साक्षी गोरे, युवराज रसाळ व नेहा जाधव यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याचे विविध पैलू उलगडले. सहाय्यक शिक्षक रोहित गमरे यांनी महाराजांनी सर्वसामान्य शेतकरी व अठरापगड जातीधर्मातील लोकांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
विशेषतः पन्हाळगड येथील सिद्धी जोहरच्या वेढ्याच्या प्रसंगावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील त्या संघर्षमय काळाची जाणीव झाली.
कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन सुधीर कदम यांनी केले, तर दादासाहेब पांढरे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत स्वराज्याच्या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. 🚩
