सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नशामुक्ती अभियानांतर्गत पोस्टर व निबंध स्पर्धेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांनी तंबाखू व व्यसनमुक्तीविषयी प्रभावी संदेश देणारी आकर्षक पोस्टर्स सादर केली. तंबाखू खाणार जीवन घालवणार, धूम्रपान थांबवा – जीवनाचे दान वाचवा, जीवनाला हो म्हणा, तंबाखूला नाही म्हणा अशा प्रभावी घोषवाक्यांनी विद्यार्थ्यांनी जनजागृतीचा संदेश दिला. श्री. अशोक शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
पोस्टर स्पर्धेत वसुधा जयस्वालने प्रथम, आर्या पवारने द्वितीय तर सिद्धी चव्हाणने तृतीय क्रमांक पटकावला. ऋतुजा कुंभार हिला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण अविनाश पोतदार यांनी केले.
व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत इयत्ता 8 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सुमारे 255 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. प्रेरणा हुमणे प्रथम, तर आर्या पवार व श्रावणी नवरंग यांनी संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक मिळवला. अनुष्का घागने तृतीय क्रमांक, तर शर्वरी कदम हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
विद्यार्थ्यांनी भविष्यात तंबाखूचे सेवन न करण्याची तसेच किमान 10 कुटुंबांशी संपर्क साधून व्यसनमुक्तीचा संदेश पसरवण्याची शपथ घेतली. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.
