सावर्डे – प्लास्टिक ही जगाची समस्या बनली आहे. प्लास्टिक मुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे पण आजच्या दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर ही गरज आहे. यासाठी योग्य नियोजन करून प्लास्टिकचा कमी वापर, पुनर्वापर, पुनर्निर्मिती व विघटन या बाबी समाजाने अंगीकारल्या तरच याचे थोडेफार परिणाम कमी होऊ शकतात.प्लास्टिक मुळे पर्यावरण नाश पावत आहे यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे असे आवाहन चिपळूण,सह्याद्री निसर्ग मित्रचे प्रकल्प अधिकारी सोहम घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणचे प्रमुख भाऊ काटदरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी सोहम घोरपडे यांचे प्लास्टिक मुक्ती, सेंद्रिय खत व कचरा वर्गीकरण या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विचार मंचावर सह्याद्री निसर्ग मित्रचे प्रकल्प सहाय्यक आयुष महाडिक, सह्याद्री आयटीआयचे प्राचार्य उमेश लकेश्री,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात व्याख्याते सोहम घोरपडे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून प्लास्टिक मुळे पर्यावरणातील प्राणी पक्षी व इतर परिसंस्थांवर झालेला परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढे अतिशय साध्या सोप्या आणि सुलभ भाषेत मांडला. प्लास्टिकचे विविध प्रकार, त्याचा वापर, परिणाम आणि विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही या परिसंवादामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन केले. प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करावा,प्लास्टिक रिसायकलला देण्याच्या पद्धती काय आहेत याची माहिती देऊन सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था आपल्या प्रशालेतून प्लास्टिक कचरा ताब्यात घेणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्लास्टिक एकत्र करावे व परिसरात याबाबत जनजागृती करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे निवेदन अशोक शितोळे यांनी केले. जयंत काकडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सावर्डे विद्यालयात प्लास्टिक मुक्ती, सेंद्रिय खत व कचरा वर्गीकरण परिसंवाद प्लास्टिक टाळा, पर्यावरणाचे संवर्धन करा- सोहम घोरपडे
