सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (दि. १४ ते २८ जानेवारी) या उपक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.
यानंतर स्फूर्ती जाधव यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे महत्त्व सांगत या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व स्पर्धांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्व विद्यार्थ्यांनी मराठी भाषा संवर्धन शपथ घेतली
कार्यक्रमात इयत्ता सातवी ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची थोरवी मांडणारे “माझी मराठी” हे गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर मराठी बोधकथा, सुविचार व म्हणींचे सादरीकरण करण्यात आले.
विद्यार्थी मनोगतात कु. स्वरांगी पाटील व आर्या जाधव यांनी मराठी भाषेची महती व तिचे सांस्कृतिक महत्त्व प्रभावीपणे मांडले. शिक्षक मनोगतात सौ. स्फूर्ती जाधव यांनी मराठी ही आपली मायबोली असून ती आपले प्रेम, संस्कृती व इतिहास जपणारी आहे; त्यामुळे मराठी भाषा जपणे व वाढवणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत व्यक्त केले. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने दरवर्षी हा पंधरवडा साजरा केला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी कु. अनघा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तीर्थ काकडे यांनी केले. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची जबाबदारी देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण व वक्तृत्वकौशल्य विकसित व्हावे, तसेच सदृढ लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण होऊन जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी विद्यालयाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत
