जागतिक वारसा यादीतील किल्ल्यांचे प्रदर्शन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
सावर्डे (प्रतिनिधी) — सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांची जाणीव निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
दुपार सत्रामध्ये तनुश्री घाग, समृद्धी राडे, प्रगती बुदर, कृपा येडगे या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी मनोगते व्यक्त केली. शिक्षक मनोगतात रोहित गमरे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचे वर्णन करत त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा विद्यार्थ्यांसमोर मांडला. “विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या थोर नेत्यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य राजेंद्र वारे यांनी मार्गदर्शन करताना टिळकांच्या राजकीय कार्याचे प्रेरणादायी प्रसंग सांगितले व अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील प्रेरणा हुमणे हिने तर आभार प्रदर्शन स्वरा धावडे हिने केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अपर्णा डिके व समृद्धी कदम यांनी केले.या प्रसंगी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित सचित्र भित्तीपत्रक सादर करण्यात आले. या भित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी इंगळे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बारा किल्ल्यांची माहिती व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी या किल्ल्यांची रेखाचित्रे तयार केली. या रेखाचित्रांचे प्रदर्शन विद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या प्रदर्शनाचे आयोजन अनुष्का काजरोळकर यांनी केले.
