सावर्डे विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचा स्तुत्य उपक्रम
‘एक देश, एक राखी’ – देशरक्षणासाठी अनोखा उपक्रम
सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान छंद मंडळाच्या वतीने ‘एक देश, एक राखी’ या उपक्रमाअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ राखी तयार करण्याची स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली. मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांसाठी या राख्या पाठवून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा अनोखा संदेश दिला.
पाचवी ते आठवी इयत्तेतील १२० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवणे, पर्यावरण संवर्धनाचे भान निर्माण करणे, व भारतीय संस्कृती जोपासणे हे होते.
राखी स्पर्धेत कोमल सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर तीर्था कोकाटे दुसऱ्या आणि आरोही चव्हाण हिने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानले. तसेच आराध्या थरवळ आणि दुर्वा परकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
या यशस्वी उपक्रमाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान शिक्षक वर्षा चव्हाण, श्रेया राजेशिर्के, वैभवी भुवड, कविता हळदीवे, दामिनी महाडिक आणि सुधीर कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशभक्ती, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जाणीव यांचे सुंदर सामंजस्य साधले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण प्रेमी पालकांनी अभिनंदन केले आहे.
सावर्डे विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचा स्तुत्य उपक्रम‘एक देश, एक राखी’ – देशरक्षणासाठी अनोखा उपक्रम
