रत्नागिरीसावर्डे विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

सावर्डे विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

सावर्डे — सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, प्रयोगशीलता वाढावी तसेच नवकल्पनांना चालना मिळावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील एकूण २९ मॉडेल्स तसेच उच्च माध्यमिक गट (इयत्ता अकरावी व बारावी) मधील २५ मॉडेल्स अशी एकूण ५४ विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आली. या प्रदर्शनात एकूण ९४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यक्ष आदरणीय श्री. मारुतीराव घाग यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी सावर्डे गावचे माजी सरपंच श्री. सुभाष मोहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रदर्शनाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रत्येक गटातून तीन उत्तम मॉडेल्सची निवड करण्यात आली तसेच उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र वारे तसेच उपमुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागातून जलविद्युत, वळणावरील रस्ता सुरक्षा, आपत्ती सूचना प्रणाली, रॉकेट लाँचर, धूरशोषक यंत्र, स्मार्ट पशुसंरक्षण यांसारखी उपयुक्त व समाजाभिमुख मॉडेल्स सादर करण्यात आली. तर उच्च माध्यमिक विभागातून पावसातील सुरक्षितता, मानवी फलन प्रक्रिया, डायलिसिस कार्यपद्धती, नदी स्वच्छता यांसारख्या विषयांवर आधारित प्रभावी मॉडेल्स मांडण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला वाव देणारे हे विज्ञान प्रदर्शन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले व शैक्षणिक वातावरणात उत्साहाची भर घालून कार्यक्रमाची सांगता झाली.

Breaking News