रत्नागिरीस्त्री शक्तीचा जागर: पटवर्धन हायस्कूलमध्ये 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा.

स्त्री शक्तीचा जागर: पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा.

येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ७ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रकट मुलाखत’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. रुपेश पंगेरकर यांनी प्रास्ताविकातून महिला दिनाचे महत्त्व विशद केले, तर श्री. राहुल शिवगण यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान
याप्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या तीन प्रमुख अतिथींचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. नमिताताई कीर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर आणि रत्नागिरी पोलीस दलातील श्रीम. प्राची पाटोळे यांचा समावेश होता. तसेच विद्यालयाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
‘प्रकट मुलाखती’तून उलगडला संघर्ष आणि यश
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री. जयेश गुरव यांनी सत्कारमूर्ती महिलांची ‘प्रकट मुलाखत’ घेतली. पोलीस प्रशासनातील आव्हाने, शिक्षण क्षेत्रातील बदल आणि संस्थात्मक जबाबदारी सांभाळताना येणारे अनुभव मान्यवरांनी अतिशय प्रभावीपणे मांडले. “जिद्द आणि चिकाटी असेल तर स्त्री कोणत्याही शिखरापर्यंत पोहोचू शकते,” आभासी दुनियेतून बाहेर या असा संदेश नमिता ताई कीर यांनी सर्व महिला शिक्षिकांना दिला असा संदेश या संवादातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संदीप कांबळे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. कौस्तुभ पालकर यांनी केले, तर श्री. अमर लवंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ--* सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे आणि...