मुंबई महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बेळगावमध्ये या ना त्या कारणावरून नेहमी कानडी गुंड उच्छाद मांडत असतात. अशातच कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग इथं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळं फासलं होतं.
त्यामुळे आता राज्य सरकारने कडक पाऊल उचललं आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द केल्या आहेत.
२२ फेब्रुवारी रोजी रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कानडी समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळं फासलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा महाराष्ट्र परिवहन विभागाने निषेध केला आहे. या प्रकरणाची गंभीर देखल घेत प्रवासी आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत, याबद्दल निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिल आहेत.
दरम्यान, परिवहन मंत्री सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. तसंच ” या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, महायुती सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे.” अशी ग्वाही देखील दिली. तसंच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील’ असे निर्देश देखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले आहे.
नेमकं काय घडलं ?
२१ फेब्रुवारी २०२५ रोजी ठिक २१.१० वाजता मुंबई आगाराची बस बंगळुरू-मुंबई येत असताना (बस क्रमांकMH14 K Q 7714) ही बस चित्रदुर्गच्या पाठीमागे दोन किलोमीटर आली होती. त्यावेळी तथाकथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस आणि चालकाला काळं फासलं. तसंच कर्तव्यावर असणाऱ्या चालक भास्कर जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली. हे दोघेही चालक आणि वाहक कोल्हापूर आगारात कार्यरत आहेत. त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आहे. आज सकाळी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांनी बस आणि चालक – वाहक यांना सुखरूप कोल्हापूर इथं आले.
दरम्यान, सीमावर्ती भागातील तणाव लक्षात घेता, प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. असे एसटी महामंडळ कडून कळवण्यात आले आहे.