‘सेवा संकल्प अभियान’: सहकार विभागाकडून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचा किराणा सुपूर्द–
👉रत्नागिरी, (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खेड व खेड तालुका नागरी सहकारी पतसंस्था संघ (फेडरेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा भटक्या व विमुक्त जाती माध्यमिक आश्रमशाळा, असोंड येथे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या वाढ आणि सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण अत्यंत आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन, या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांचे किराणा सामान शाळेस सुपूर्द करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या विकासात खेड तालुक्यातील सहकार क्षेत्राला खारीचा वाटा उचलता आला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, खेड) योगिता मुरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खेड तालुका नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष वसंत पिंपळकर, कार्याध्यक्ष श्री. अभिनय महाजन, उपाध्यक्ष श्री. संदिप मोदी, सचिव रमाकांत पाटील, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भरणे) संदिप तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी (जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. असोंड) दिनेश पाटील, सदस्य श्रावणी आंबेडे व स्नेहा हळदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन व आभार आश्रमशाळेचे अधीक्षक संतोष हांडे यांनी केले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार विभागाच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
