आमदार शेखर निकम यांनी घेतली मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट–.
👉कोकणात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी स्वतंत्र मत्स्य बीज केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावांना गती द्यावी. जलसंपदा महामंडळाच्या अखत्यारीतील जागेबाबत संबंधित स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णयानंतर महामंडळाच्या संचालक मंडळाचा ठराव सादर करावा, असे निर्देश बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
आमदार शेखर निकम यांनी चिपळूण –वशिष्ठी खाडीतील गाळ काढणे आणि रत्नागिरीमध्ये शासकीय जागेवर मत्स्यबीज केंद्र उभारण्यासाठी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या पुढील टप्प्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
कोकणात मोठ्या क्षमतेचे मत्स्य बीज केंद्र आवश्यक असून त्यासाठी प्रस्तावित दोन हेक्टर क्षेत्र अपुरे असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले. अशा केंद्रासाठी किमान पाच हेक्टर, तर शक्य असल्यास आठ ते दहा हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. खाडीलगत सुमारे ४० एकर शासकीय जमीन उपलब्ध असून तिचा खाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी उपयोग करता येऊ शकतो. रासायनिक घटकांचा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी या जागेची तांत्रिक पाहणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी कालव्यालगत जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जागेचा प्रस्ताव पुढे आला आहे. महामंडळाच्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नियमानुसार ठराव आवश्यक असल्याने संबंधित प्रस्तावाचा पाठपुरावा करून तो संचालक मंडळासमोर ठेवावा. जमीन उपलब्ध झाल्यानंतर मत्स्य बीज केंद्राच्या कामाला सुरुवात करता येईल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल दूरदृष्यप्रणालीद्वारे तर मत्स्य आयुक्त आणि जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
