लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन;
चिपळूण, मंडणगड व गुहागर येथे व्याख्याने आणि जनजागृती मोहीम
रत्नागिरी, (जिमाका) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रबोधन, व्याख्याने, चर्चासत्रे आणि नागरिकांमध्ये थेट जनजागृती अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
पंचायत समिती व पोलीस ठाणे, चिपळूण येथे मार्गदर्शन
चिपळूण येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तहसीलदार कार्यालय व पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समिती परिसरामध्ये जनजागृती करणारे स्टिकर्स लावण्यात आले व उपस्थित नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देऊन हॅण्डबिल्सचे वाटप करण्यात आले.
यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांसाठीही अविनाश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानानंतर झालेल्या चर्चासत्रात पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
मंडणगडमध्ये अधिकारी व नागरिकांचे प्रबोधन
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, मंडणगड येथे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांनी तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तसेच मंडणगड पोलीस ठाणे, मंडळ अधिकारी कार्यालय, उपकोषागार कार्यालय आणि मंडणगड बस स्थानक परिसरात जनजागृतीपर स्टिकर्स लावून नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
पाटपन्हाळे (गुहागर) येथे ग्रामस्थांशी संवाद
ग्रुप ग्रामपंचायत पाटपन्हाळे (शृंगारतळी, ता. गुहागर) येथे पोलीस पाटील, पोलीस मित्र व स्थानिक ग्रामस्थांसाठी पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान व चर्चासत्र पार पडले. उपस्थित ग्रामस्थांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना व शंकांना यावेळी उत्तरे देण्यात आली.
माध्यमांद्वारे व्यापक प्रचार
भ्रष्टाचाराविरुद्ध जनमानसात जागृती निर्माण करण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रे, केबल टीव्ही, आकाशवाणी तसेच व्हॉट्सॲप ग्रुप्स व डिजिटल बॅनर्सचा प्रभावी वापर करून जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले. स्थानिक वृत्तपत्रांसोबत जनजागृती पत्रकांचे वाटप करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हा संदेश तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
