लांजा तालुका मध्ये खानवली ग्रामपंचायत चौगुले वाडीचा (सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श) “एक दिवस वाडी साठी”
“पाणी अडवा पाणी जिरवा” मोहिमेतून जलसंवर्धनाचा आदर्श
पाणी हे जीवन आहे त्याचे मोल आता मात्र अखंड महाराष्ट्रभर पहायला मिळत असताना मात्र
लांजा तालुक्यातील खानवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चौगुले वाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ सर्व ग्रामस्थांनी “एक दिवस वाडी साठी” “पाणी अडवा पाणी जिरवा” “पाणी हे जीवन आहे” ही म्हण सत्यात उतरवून गावातील असलेल्या मुख्य पाणी सुविधेला हात घातला. यांच्या या कार्यातून सामाजिक एकोपा, माणुसकी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट; श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प केला आणि दोन ठिकाणी ओढ्याचे (पऱ्याचे) पाणी वाहून जाऊ देण्यापेक्षा ते गावातच अडवून जमिनीत मुरवणे, भूजलसाठा वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या उद्देशाने खानवली चौगुले वाडी येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे केवळ शासनाच्या योजना आणि निधीची प्रतीक्षा न करता स्वतःच्या श्रमातून गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले. त्या साठी विशेष सहकार्य म्हणून खानवली ग्रामपंचायत यांनी केले तर. गावातील आणि मुंबईतील व्यक्तीनी समाजाप्रती भावनात्मक विचार करून स्वखर्चाने चहा नाश्ता याची निस्वार्थी मदत केली.
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट दाखवली उन्हाळ्याच्या दिवसांत विहिरींची पाणीपातळी खालावणे आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणे अशा समस्या ग्रामीण भागात जाणवतात. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संकटाची चाहूल ओळखून वेळीच जलसंधारणाची कामे हाती घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.त्यामुळे आज केलेले श्रमदान उद्याच्या पिढीसाठी पाण्याची सुरक्षितता निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले.
गावातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक श्रमदान करणे, स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे आणि जलस्रोतांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. गावातील व मुंबईतील तरुण, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास गावपातळीवर जलसंवर्धनाची प्रभावी चळवळ उभी राहू शकते. पाणी अडवा पाणी जिरवा हे उत्तम उदाहरण खानवली चौगुले वाडी ग्रामस्थानी करून दाखवले असून गावात एक वेगळा आदर्श घडवून आणला आहे. व यांचे कौतुक देखील तालुक्यातील शासन दरबारी होत आहे.
