सावर्डे विद्यालयात वर्गांतर्गत बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
६७ विद्यार्थ्यांचा सहभाग–
चिपळूण तालुक्यातील सावर्डे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याला आणि सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वर्गांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील एकूण ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.
विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, निर्णयक्षमता आणि नियोजन कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी अशा तीन वयोगटांत मुले व मुलींसाठी स्वतंत्रपणे घेण्यात आली. प्रत्येक गटातील सामने अत्यंत चुरशीचे झाले. खेळाडूंनी विचारपूर्वक चाली रचत प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिले.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे आगामी संस्थांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेसाठी आराध्य बागवे, श्रवण घाणेकर, आर्या चव्हाण, मुक्ता भुवड, लावण्या मोहिरे, मनस्वी मेस्त्री, प्रज्वल सुर्वे, समर्थ सोनवणे, नीरज इनामदार आणि साई जाधव या खेळाडूंची निवड करण्यात आली.
सर्व खेळाडूंचे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, शिक्षकवृंद तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
