गणपतीपुळे मंदिरात दीपोत्सवाची सांगता; पाच हजार पणत्यांनी उजळला परिसर
कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील पारंपरिक दीपोत्सवाची त्रिपुरारी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात सांगता झाली. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या महिनाभराच्या काळात हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
या संपूर्ण महिन्यात दररोज संध्याकाळी सात वाजता मंदिर आणि आजूबाजूचा परिसर तेलाच्या दिव्यांनी आणि पणत्यांनी उजळून निघत होता. आरतीच्या वेळी मंदिरातील सर्व विजेचे दिवे, पंखे आणि रोषणाई नेहमीप्रमाणे बंद ठेवण्यात येत होती. त्यामुळे केवळ तेलाच्या दिव्यांच्या शांत प्रकाशात मंदिरात प्रसन्न वातावरण निर्माण होत होते. आरती, मंत्रपुष्प आणि प्रार्थनेनंतर भाविकांना प्रसाद वाटप करून रोजच्या उत्सवाचा समारोप होत होता.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिराचा गाभारा आणि त्रिपुर उजळवण्यात आले. तसेच मंदिर परिसरात पाच हजारांहून अधिक तेलाचे दिवे आणि पणत्या लावण्यात आल्या होत्या. हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी हजारो गणेशभक्तांनी मंदिरात गर्दी केली होती.
महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाचे सर्व नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे पंचकमिटी आणि पुजाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे केले होते, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर यांनी दिली.
