शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा…जाणून घ्या शेतीसाठी तज्ञांचा महत्त्वाचा सल्ला–
फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने, मार्च महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे. राज्यभर उष्णतेची लाट जाणवणार असून, काही भागांत उन्हासोबत अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी हा महिना अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेश आणि पश्चिम-उत्तर भारतात हवामान बदलण्याची शक्यता आहे. 2 मार्चपासून पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत असल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येईल.
विशेषतः 4 मार्चपासून इंदूर, ग्वाल्हेर आणि चंबळ भागात ढगाळ वातावरण राहू शकते, तसेच काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील तापमान किती वाढणार ?
IMD पुणेचे माजी प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.कोकण आणि गोवा भागात मात्र हवामान तुलनेने थोडे सौम्य राहील, आणि येथे तापमानात फारसा मोठा फरक जाणवणार नाही.पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, सांगली आणि परभणी या भागांत तापमान सरासरीच्या तुलनेत 2-3 अंश सेल्सिअसने जास्त राहू शकते.
शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित सल्ला
उष्णतेचा मोठा प्रभाव शेतीवरही पडण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा लवकर आटण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
मार्च महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघात आणि अन्य उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या होऊ शकतात. त्यामुळे खालील उपाय करणे गरजेचे आहे:
दुपारी 12 ते 3 या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. पुरेसं पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा ओढणी घ्या आणि हलके व सुती कपडे घाला.उन्हात अधिक वेळ राहिल्यास नारळपाणी, ताक किंवा लिंबूपाणी पिणे फायदेशीर ठरेल. उन्हामुळे चक्कर येत असल्यास तातडीने सावलीत जाऊन थंड पाणी प्यावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.