महाराष्ट्र शासनाच्या ६१ दिवसांच्या बंदी कालावधी नंतर आज पासून पुन्हा मासेमारी सुरू होणार असल्याने आता सर्व बंदरे गजबजून जाणार आहेत.या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे चार हजार बोटी मासेमारी साठी समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत..बंदी उठली असली तरी पुढील काही दिवस समुद्र शांत व स्थिर असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे.
१ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बोटींची देखभाल दुरुस्ती केल्यानंतर या बोटीच्या रंग नियमावलीनुसार (कलर कोड) रंगरंगोटी तसेच बोटीचा नंबर कोरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी या बोटींची पारंपारिक पद्धतीने पूजा करून मासेमारीसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती मच्छीमारांकडून प्राप्त झाली आहे.
बोटीवर असणाऱ्या खलाशांनी मत्स्य व्यवसाय विभागाने यापूर्वी दिलेले बायोमेट्रिक कार्ड अथवा क्यूआर कोड असलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. मासेमारी बोटींची तपासणी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी कार्यरत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली.
मध्यरात्रीनंतर या बोटी समुद्राकडे प्रयाण करणार असून पुढील दोन आठवडे स्वच्छ वातावरण व समुद्र शांत असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने मासेमारीची पहिली फेरी लाभदायक ठरावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.
मासेमारी बोटीना एआयएस बसवणे अनिवार्य
प्रत्येक मासेमारी बोटींची माहिती व सद्यस्थिती (लोकेशन) मत्स्य व्यवसाय विभागाला मिळावी या दृष्टीने दोन सिलेंडरपेक्षा अधिक क्षमतेच्या प्रत्येक मासेमारी बोटीला स्वयंचलित माहिती प्रणाली अर्थात ऑटोमेटेड इन्फॉर्मेशन सिस्टम नौकेवर बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रणालीतील ट्रान्सपोडर केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून देण्यात येणार असून याद्वारे संकलित होणारी माहिती जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षात उपलब्ध होणार आहे. सुमारे ७० टक्के मासेमारी बोटीनी ही प्रणाली कार्यान्वित केली असून उर्वरित मासेमारी बोटी पुढील काही दिवसात ही प्रणाली कार्यान्वित करतील व नंतरच मासेमारीसाठी जातील असे सांगण्यात आले.आज पासून मासेमारी हंगाम सुरू होत असला तरी खऱ्या अर्थाने नारळी पौर्णिमे नंतरच मासेमारीला अधिक जोर येईल असे काही मच्छीमाराने कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ बोलताना सांगितले