बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच महिलांना कुठेही आणि कधीही स्तनपान देण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान “जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह” साजरा करण्यात येतो. “शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू” या संकल्पनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षाची थीम : “स्तनपानाला प्राधान्य द्या : शाश्वत सहाय्यक व्यवस्था तयार करा”अशी आहे.
ज्या बाळांना जन्मापासून योग्य प्रमाणात स्तनपान मिळत नाही, अशा बाळांमध्ये कुपोषणाचा धोका वाढतो. परिणामी त्यांना आजारपण व कधीकधी बालमृत्यूला देखील सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत स्तनपानाबद्दल महत्त्वाची जनजागृती करण्यात येत आहे.
याअनुषंगाने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये होते. कार्यक्रमाला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, रुग्णालय प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. वसिम सय्यद, वैद्यकीय महाविद्यालय चे सहाय्यक प्राध्यापक डॉ.शायन पावसकर, डॉ.आदित्य वडगावकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी नामदेव बेंडकुळे,जिल्हा रुग्णालय अधिसेविका जयश्री शिरधनकर, पी.एच.एन. माया सावंत तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी चित्रफितीद्वारे उपस्थितांना स्तनपानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले की,आईचे दूध हे बाळासाठी अमृतासमान आहे.प्रसूतीनंतर एका तासाच्या आत दिलेले चीकदूध म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण असून त्यातून बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळते.जन्मापासून ते ६ महिने फक्त आईचे दूध (निव्वळ स्तनपान) देणे आवश्यक आहे.६ महिन्यानंतर स्तनपानासोबतच पूरक आहार देण्याची सवय लावल्यास बाळ एका वर्षात पूर्ण जेवण घेण्यास सक्षम होते व कुपोषण टाळता येते.पहिल्या सहा महिन्यांनंतरही स्तनपान सुरू ठेवून पूरक आहार दिल्यास बाळाची शारीरिक व मानसिक वाढ योग्य प्रकारे होते.
आई व बाळासाठी फायदे स्तनपानामुळे केवळ बाळाचेच नाही तर मातेलाही खालीलप्रमाणे अनेक फायदे होतात:
बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते व त्याची शारीरिक-मानसिक वाढ होते.
आई-बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो.
मातेचा पाळणा नैसर्गिकरीत्या लांबतो व शरीर सुडौल राहते.
स्तन, गर्भाशय, अंडाशय व इतर कर्करोगाचा धोका कमी होतो.
बाळंतपणानंतर गर्भाशय आकुंचन पावून पूर्वस्थितीत येण्यास मदत होते.
हिरकणी कक्षांची स्थापना :
स्तनपान सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात “हिरकणी कक्ष” स्थापन करण्यात आले आहेत. येथे मातांना निसंकोचपणे स्तनपान करता येईल तसेच आशा व आरोग्यसेविकांकडून आवश्यक मार्गदर्शन मिळेल.याशिवाय, अनेक शासकीय व खाजगी कार्यालये, दवाखाने, रेल्वे स्थानक, बस स्थानक, मॉल आदी ठिकाणीही स्तनदा मातांसाठी सुरक्षित हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सर्व स्तनदा मातांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.