संगमेश्वर : दि. १० ऑक्टोबर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विक्रांत भास्कर जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
विक्रांत जाधव हे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असून, आपल्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत ग्रामीण भागातील रस्ते बांधणी, पाणीपुरवठा योजना आणि शैक्षणिक सुविधा सुधारण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने विक्रांत जाधव यांच्या कार्यशैली, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क क्षमतेचा विचार करून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना नव्याने बळकट करण्याच्या दृष्टीने युवा नेतृत्वाला संधी दिली आहे.
या निर्णयानंतर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
राजकीयदृष्ट्या ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नव्या नेतृत्वामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षात व्यक्त केला जात आहे. विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वामुळे युवा पिढीला प्रेरणा मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
