रत्नागिरीआज १७ ऑक्टोबर - रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योगपती गद्रे मरीनचे दीपक शेठ...

आज १७ ऑक्टोबर – रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योगपती गद्रे मरीनचे दीपक शेठ गद्रे यांचा वाढदिवस…

दीपक गद्रे यांची ‘गद्रे मरीन’ ही कंपनी म्हणजे मासळी व्यापार, मासळी निर्यात आणि जागतिक सीफुड स्नॅक्स क्षेत्रातलं एक प्रमुख नाव.
दीपक गद्रे यांचे पणजोबा हरी पांडुरंग गद्रे यांचं देवरुख इथे किराणा मालाचं दुकान होतं. आजोबा दामोदर यांनी बंधू शिवराम यांच्यासोबत ‘दामोदर शिवराम’ या नावाने संगमेश्वर इथे व्यवसायाचा विस्तार केला. पुढे दीपक गद्रे यांच्या वडिलांनीही किरकोळ आणि घाऊक स्वरूपाच्या व्यवसायात रत्नागिरी जिल्ह्यातच संगमेश्वर आणि इतर तालुक्यांत जम बसवला. या पार्श्वभूमीवर दीपक मुंबईच्या सिडनेहॅम महाविद्यालयातून बी. कॉम. झाले तेव्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. मुंबईत एखाद्या बँकेत नाही तर कंपनीत नोकरी करणं किंवा गावी येऊन वडिलांच्या व्यवसायात काम करणं. मात्र, घरात लहानपणापासून पाहिलेल्या वातावरणामुळे असेल, पण कोणत्याही द्विधा मनःस्थितीत न सापडता ते मुंबईहून संगमेश्वरला आले आणि वडिलांसोबत काम करू लागले.
व्यवसायाच्या निमित्ताने गद्रेचा मुंबईच्या ‘टाटा ऑइल मिल’ या कंपनीशी सतत संपर्क असायचा. ही कंपनी रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या कोळ्यांकडून मासे विकत घेत असे आणि मुंबईत नेऊन त्यावर प्रक्रिया करून त्यांची निर्यात करत असे. दीपक यांच्यातल्या उद्योजकाला यामध्ये व्यवसायाची संधी दिसली. प्रक्रिया केलेले मासे आपणच मुंबईत ‘टाटा’ कंपनीला पोचवावेत असं त्यांना वाटलं. वडिलांशी सल्लामसलत झाल्यानंतर त्यांनी ‘टाटा’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या कंपनीलाही ही ऑफर रास्त वाटली. मत्स्य विक्री व्यवसायाचा काही अनुभव असल्याने त्यांनी मुंबईच्या फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. पुढच्या काळात विश्वव्यापी ठरलेल्या दीपक यांच्या माशांच्या व्यवसायाची सुरुवात ही अशी झाली.
दीपक गद्रे यांनी त्यांना रत्नागिरीतच ‘फिनिश प्रॉडक्ट’ बनवून देतो, असे सांगितले आणि गद्य यांचा या व्यवसायात शिरकाव झाला. पाच वर्षाच्या अनुभवाने त्यांना मोठी उडी मारण्याचा आत्मविश्वास दिला. दीपक यांना माशांच्या व्यवसायात यावंसं वाटण्यामागे आणखी एक कारण होतं. त्या काळी गद्रे कुटुंबाकडे एस्सो कंपनीची डिझेलची एजन्सी होती. रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या मासेमारी करणाऱ्या बोटींना त्यांच्यामार्फतच डिझेल पुरवलं जात असे. त्या संदर्भात दीपक अनेकदा समुद्रावर जात असत, कोळ्यांना भेटत असत. तिथे किती मासे पकडले, किती रुपयांना विकले, किती रुपये फायदा यांचा अभ्यास करत असत.सुरवातीच्या काळात कोळी लोकं जाळ्यात अडकलेले छोटे मासे कुणी खात नाहीत म्हणून ते तिथेच टाकून जायचे. दीपक गद्रे यांनी मात्र त्या माशांवर प्रक्रिया करून ते फ्रोझन मासे म्हणून शीतगृहात ठेवून विकण्यास सुरवात केली. त्याच वेऴी सरकारच्या पदवीधर बेरोजगार योजना त्यांना एमएसएफसी व सीकॉम अंतर्गत कारखाना काढण्यासाठी कर्ज मिळाले, बॅका व अन्य व्यापार्यांच्या साह्यातून २५ लाख रुपयाचे कर्ज त्यांनी सुरुवातीस काढले काही रक्कम मच्छीमाराना दिली, मात्र बरेचसे पैसे अडकले.
आणि हे कर्ज पोहोचले तब्बल ६० लाखांवर तरी त्यांनी निग्रहाने व्यवसाय सुरू ठेवला. चीनमध्ये रिबनफिशला खूप मागणी असल्याचे कळल्यानंतर त्यांनी या माशांच्या निर्यातीस सुरुवात केली. जाळ्यातुन कोळंबी सोबत येणारे पण टाकाऊ असणाऱ्या या माशांना परदेशी बाजारपेठ मिळाली.
एकदा ते जपानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तिथे सुरिमी प्लांट बघितला. त्याचा उपयोग आपल्याला व्यवसाय वाढवण्यासाठी होऊ शकतो असं लक्षात आल्यावर त्यांनी भारतात आल्यावर १९९४ साली भारतातला पहिला सुरिमी प्लांट उभा केला.जसा जसा कंपनीचा उत्कर्ष होऊ लागला तेव्हा दीपक गद्रेंनी अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग यंत्रे मागवून त्यातून प्रक्रिया सुरु केली. दूरच्या देशात त्यांना मासे निर्यात करता येऊ लागले. त्यामुळे त्यांनी आपला दर्जा कधी घसरू दिला नाही. माशांची निर्यात सुरू असतानाच त्यांना ‘सुरिमी’ गवसली. जपानी लोक माशांच्या पांढऱ्या रंगाच्या मांसापासून बनलेली ‘सुरिमी’ वापरतात. ही ‘सुरिमी म्हणजे आपल्याकडची तिंबलेली कणिक, जपानमध्ये हजारांहून अधिक पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुरिमीची बाजारपेठ ओळखून त्यांनी १९९४ मध्ये भारतातला पहिला सुरिमी बनविण्याचा कारखाना उभारला. पूर्वी केवळ माशाचा ३० ते ३५ टक्के भाग वापरला जायचा. मात्र, आता माशाचा १०० टक्के भाग वापरला जातो. त्यामुळे, मत्स्यव्यवसायाला अमर्याद वाव आहे, असे गद्रे सांगतात. आता माशांचे मांसच नव्हे तर माशांची त्वचा, खवले आणि काड्यांपासून सौंदर्यप्रसाधने व सौंदर्यवर्धक औषधे बनतात. ‘गद्रे मरीन’मध्ये माशांच्या निर्यातीत कोळंबी शेती तसेच कोळंबी प्रक्रिया केली जाते. शिवाय त्यांनी बनवलेल्या माशांच्या विविध खाद्यपदार्यांच्या निर्यातीचा आकडा २५ हजार टनापर्यंत पोहचला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल आहे ४२५ कोटी. गद्रे ब्रॅडने आता देशभर मेट्रोसिटीमध्ये ‘रेडी टू कूक अॅण्ड रेडी टू इट’ खाद्यपदार्थ दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या कारखान्यात माशांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेल्या पाण्यापासून इंधनही बनवले जाते. त्यातून निघालेल्या मिथेन वायूचा उपयोग बॉयलरमध्ये इंधन म्हणून केला जातो. शिवाय, माशांच्या अन्न टाकाऊ उद्यापासून उत्तम खत बनवले जाते.
त्यांचे सुपुत्र गद्रे मरीनचे M.D. अर्जुन गद्रे यांनी १९९९ साली या व्यवसायात पदार्पण केल्यानंतर कंपनीने मत्स्यउद्योगात भारतातर्फे ‘न भूतो..’ अशी कामगिरी केली. १९९९ पासून ‘गद्रे’ हेच भारतातर्फे मत्स्यपदार्थ निर्यातीत ‘ट्रस्टेड ब्रँड’ आहेत.
सध्या गद्रे मरीनचे विविध प्रोडक्टस चीन, जपान, द कोरिया, मलेशिया, तैवान, ऑस्ट्रेलिया सह विविध देशात निर्यात होतात. रत्नागिरीतल्या गद्रे मरीन च्या कारखान्यातून सुमारे दीड हजार तरुणांना रोजगार मिळालाय. पहिल्यांदाच कोकणी चवदार मसाल्यांसह रेडी टू कूक मत्स्यपदार्थ बनविणाऱ्या गद्रे कंपनीने ‘फ्रोझन (फिश) फूड्स’ क्षेत्रात अभूतपूर्व, आनंददायी आणि अल्पावधीत फार मोठी झेप घेण्याची अविश्वसनीय कामगिरी केली आहे. क्रॅब स्टिक्स, मसाला बांगडा, मसाला प्रॉन्स, फ्लेवर्ड फिशसह शेकडो मत्स्योत्पादने देशविदेशात खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवीत आहेत.
आज घडीला गद्रे मरीन ही जगातली ३ री सुरमी प्लांट असलेली कंपनी आहे. रत्नागिरी, महाराष्ट्र आणि अनुक्रमे चोरवाड , गुजरात न ब्रम्हावर, कर्नाटक अशा ठिकाणी गद्रे मरीनचे तीन प्लांट्स आहेत.तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी एमआयडीसी येथे प्लास्टिक पायरोलिसीस म्हणजे प्लास्टिकवर प्रक्रिया करून डिझेल बनवण्याचा प्रकल्प दीपक गद्रे यांनी यशस्वी केला आहे. एक हजार किलो प्लास्टिकपासून ८०० लिटर डिझेल बनवले जाते. त्यातून तयार होणाऱ्या १० टक्के कार्बन व १० टक्के वायूचा उपयोग पुन्हा डिझेलनिर्मितीसाठी वापरला जातो. डिझेलचा उपयोग कंपनीतील पॉवर जनरेटरसाठी केला जातो. त्यामुळे या प्रकल्पात कोणतीही गोष्ट वाया जात नाही. जागतिक दर्जाचे डिझेल बनवणारा हा कोकणातील पहिलाच प्रकल्प आहे.
२००९ पासून सलग चार वर्षे बेस्ट एक्स्पोर्ट परफॉर्मन्स, HACCP सर्टिफिकेट, BRC सह विविध आंतरराष्ट्रीय सन्मान गद्रे मरीनने मिळवले आहेत.
केवळ व्यवसायिक यश हेच अंतिम ध्येय समोर न ठेवता दिपक गद्रे यांनी खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य, विविध सामाजिक उपक्रमांना मदत, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांना सहाय्य केलं आहे, मात्र त्याची बातमी केली नसल्याने हे ‘गुप्तदान’ सत्कारणी लागूनही प्रसिद्धीस पावले नाही. कला आणि क्रीडा क्षेत्रालाही दीपक गद्रे व अर्जुन गद्रे आणि एकूणच ‘गद्रे मरीन’ने मोलाची मदत केली आहे.कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे प्रसिद्ध उद्योगपती दिपक शेठ गद्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Breaking News