रत्नागिरीसावर्डे – एक भारत श्रेष्ठ भारत (पेन मित्र) योजनेअंतर्गत गोविंदराव निकम माध्यमिक...

सावर्डे – एक भारत श्रेष्ठ भारत (पेन मित्र) योजनेअंतर्गत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन समृद्ध राज्यांच्या सांस्कृतिक वारशाचा सुंदर सेतूबंध उभारला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी दोन्ही राज्यांतील सण-उत्सव, परंपरा, रीतीरिवाज, वन्यजीव, ऐतिहासिक स्थळे, कला, साहित्य व सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांची माहिती अभ्यासून ती एकमेकांना सादर केली.

या उपक्रमात एकूण नऊ विद्यार्थ्यांनी थेट सहभाग घेतला असून इतर विद्यार्थ्यांनी माहिती संकलन, चित्रे गोळा करणे, सादरीकरण तयारी, पोस्टर व फोल्डर तयार करणे अशा विविध पद्धतींनी महत्त्वाची मदत केली. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील गणेशोत्सव, गुढीपाडवा, वाघोबा-देवता परंपरा, सह्याद्री परिसरातील वन्यजीव, अजिंठा-वेरूळ, रायगड, कोकणातील खाद्यसंस्कृती अशा विविध घटकांची माहिती एकत्रित केली. त्याचप्रमाणे ओडिशातील रथयात्रा, दुर्गापूजा, कोणार्क सूर्य मंदिर, चिल्का सरोवरातील जैववैविध्य, ओडिशी नृत्य, विविध लोककला व हस्तकला यांची माहितीही विद्यार्थ्यांनी उत्साहाने गोळा केली.

विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या माहितीचे चित्रांसहित आकर्षक सादरीकरण तयार करून ते परस्परांना पेन मित्र उपक्रमांतर्गत आदानप्रदान केले. त्यामुळे दोन भिन्न राज्यांच्या संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, ऐक्यभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन सावर्डेकर एस. एस. मॅडम यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती संकलनाची योग्य पद्धत, स्त्रोतांची निवड, सृजनशील सादरीकरण तसेच राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे महत्त्व समजावून दिले.

एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन तर झालेच, पण विविधतेतील एकता हा भारताचा आत्मा असल्याची जाणीवही अधिक दृढ झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि पालकांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

Breaking News