रत्नागिरीरत्नागिरी येथे आयोजित साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात.. रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन...

रत्नागिरी येथे आयोजित साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात.. रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन प्रतिष्ठेला साजेसे आणि अविस्मरणीय करण्याचा संयोजन समितीचा निर्धार!

नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी, मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्कृती मंडळ आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून हे साहित्य संमेलन दिनांक २२ नोव्हेंबर शनिवारी आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहराच्या नजीकच नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या भव्य परिसरात या संमेलनाचे आयोजन होत असून या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री तथा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या खंबीर पाठिंब्याने होणाऱ्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक अभिजीत हेगशेट्ये तर संमेलनाचे अध्यक्ष राजन जी गवस हे सुप्रसिद्ध लेखक असणार आहेत.
या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी सहा वाजताच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे.
ग्रंथदिंडी मध्ये जिल्ह्यातील विविध श्रेष्ठ साहित्यिकांचा परिचय करून देणारे चित्ररथ सहभागी होणार असून साहित्य प्रेमी जनतेसाठी ही दिंडी आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे आयोजन समितीने सांगितले आहे.

दिवसभर चालणाऱ्या या जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर दिवसभर विविध परिसंवाद, काव्यसंमलेन, मुलाखती यांचे आयोजन करण्यात आले आहे.
धनंजय कीर साहित्य नगरी,बदिऊजमा खावर सभागृह, माधव कोंडविलकर ग्रंथ प्रदर्शन, कविकेशवसुत काव्य कट्टा अशी जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांची नावे विविध कार्यक्रम स्थळांना देण्यात आली आहेत.
या संमेलनात श्री गौरी सावंत, तसेच आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार असल्याने हे संमेलन अविस्मरणीय ठरणारे होईल या साठी संपूर्ण नियोजन नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी दिली आहे,तसेच जिल्ह्यातील सर्व सुसंस्कृत व साहित्यप्रेमी मंडळीना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
संमेलनासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून या ठिकाणी शासकीय ग्रंथ, संदर्भ ग्रंथ प्रदर्शन,विक्री उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने वाचनालये, संग्राहक यांच्या साठी ही पर्वणी ठरणार असल्याचे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे आयोजन प्रमुख यांनी सांगितले.
या बैठकीला स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, दुर्गेश आखाडे, संजय वैशंपायन प्राचार्य घवाळी आदी संयोजन समितीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते.

Breaking News