रत्नागिरीकेंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद; वाटद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा सहभाग

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद; वाटद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा सहभाग

वाटद येथील रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंडाळा (वाटद) येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हा परिषद संचलित शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सविता तोटावर गणपतीपुळे बीट , केंद्रप्रमुख श्री संतोष मोहिते ,माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल पवार ,माजी सरपंच श्री अनिकेत सुर्वे ,श्री आबा सुर्वे, श्री बापू घोसाळे, सौ. मेघना पाष्टे मॅडम, माजी पंचायत समिती सभापती तसेच वर्षा राजे निंबाळकर (रत्नसिंधू न्यूज मिडिया) हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

सकाळी उद्घाटनानंतर विविध धावण्याचे प्रकार, लांब उडी, गोळाफेक, कवायत अशा शालेय स्तरावरील पारंपरिक व आधुनिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. खेळाडू विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत क्रीडा आत्मसन्मानाची जाणीव घडवून दिली.

कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्याध्यापिका सौ. स्वाती बेंद्रे मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. मंजुषा झगडे मॅडम तसेच सर्व शिक्षकवर्ग, पालक समिती सदस्य व पालकवर्ग यांनी परिश्रम घेऊन नियोजन केले. कार्यक्रमाचे सुयोग्य व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकवर्गाने मोठी उपस्थिती ठेवली.

प्रमुख पाहुण्या वर्षा राजे निंबाळकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हटले की, “शालेय जीवनात क्रीडा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, उत्साह व निरोगी स्पर्धात्मकता निर्माण करण्याचे सामर्थ्य क्रीडेमध्ये आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व आयोजक शिक्षकवर्गाचे आभार मानले.

केंद्रस्तरीय या स्पर्धेत खालील शाळांचा सहभाग होता –
१) वाटद मिरवणे
२) वाटद कवठेवाडी
३) वाटद रायवाडी
४) वाटद नंबर-१
५) वाटद धोपटवाडी
६) वाटद कोंडवाडी
७) वाटद खंडाळा

कार्यक्रमाची सांगता पुरस्कार वितरणाने झाली. यावेळी उत्तम खेळाडूंना प्रमाणपत्रे व मेडल देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागात क्रीडा संस्कार रुजविण्याचे कार्य अशा स्पर्धांमुळे पुढे जात असल्याचेही मत पालकांनी यावेळी व्यक्त केले.

Breaking News