रत्नागिरीवैकल्पिक वाद निवारण केंद्र 'विधी सेवा सदन'चे उद्घाटनविधी सेवा सदन इमारतीमुळे वैकल्पिक...

वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’चे उद्घाटनविधी सेवा सदन इमारतीमुळे वैकल्पिक वाद निवारण होणार सुसह्य- पालक न्यायमूर्ती माधव जामदार

रत्नागिरी, (जिमाका) : ‘विधी सेवा सदन’मुळे योग्य वातावरणात पक्षकारांना आपसातील वाद निवारण करणे सुसह्य होणार आहे, असे मार्गदर्शन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.
जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या “विधी सेवा सदन” या वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, जिल्हा न्यायाधीश 2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिरुध्द फणसेकर, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिक्षक डाॕ संघमित्रा फुले आदी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती श्री. जामदार म्हणाले, मोफत कायदेशीर मदत प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होईल. न्यायालयीन तरतुदींच्या आधारे काही वेळा न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे पक्षकार समाधानी होत नसतात. अशावेळी न्यायालयीन पूर्व वैकल्पिक वाद निवारण केंद्राद्वारे होणारी तडजोड ही कायम स्वरूपाची असते. त्यामुळे पक्षकारांत असणाऱ्या वादांचे निवारण हे वैकल्पिक वाद निवारण केंद्राद्वारे होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
न्यायालयीन तरतुदींच्या आधारे न्याय देण्यासाठी समाजाला न्यायालयांची गरज आहे. पण, वाद निवारण केंद्र, लोकअदालत यांसारख्या न्यायालयीन पूर्व वाद मिटवणाऱ्या संस्थांचीही तितकीच गरज आहे. याद्वारे होणाऱ्या निवाड्यांमुळे न्यायालयांवरचा ताण कमी होईल. अलीकडच्या काळात न्यायालयीन दाव्यांचे स्वरूप बदलले असल्यामुळे काही वेळा न्यायालयीन तरतुदींना मर्यादा येत असतात. अशावेळी सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी वैकल्पिक वाद निवारण केंद्रासारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशा वैकल्पिक केंद्रांच्या यशासाठी न्यायाधीश, वकील व पक्षकारांची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही न्यायमूर्ती श्री. जामदार म्हणाले.
प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत (नालसा) होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांना जलद, परवडणारा व समाधानकारक न्याय मिळवून देणे हे नालसाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. तसेच विक्रमी दोन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यास मदत व मार्गदर्शन केल्याबद्दल पालक न्यायमूर्ती श्री. जामदार यांचे आभार मानले.
जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री. फणसेकर यांनी वैकल्पिक वाद निवारण, लोक अदालत याद्वारे न्याय मिळविण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होत असल्याचे सांगितले.
बार असोसिएशचे अध्यक्ष श्री. पाटणे, पूर्वीच्या काळी पारावरच्या न्यायाची संकल्पना ही आताच्या वैकल्पिक वाद निवारण केंद्रात अंतर्भूत असल्याचे म्हणाले.
यावेळी वैकल्पिक वाद निवारण केंद्रामार्फत न्याय मिळालेल्या दाम्पत्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी या इमारतींच्या बांधकामादरम्यान मदत झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. कुलकर्णी व त्यांच्या पथकाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायाधीश, वकील व विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

Breaking News