रत्नागिरीकडवई बाजारपेठेत व्यापाऱ्यांचा प्लास्टिकला पूर्णविराम

कडवई बाजारपेठेत व्यापाऱ्यांचा प्लास्टिकला पूर्णविराम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामपंचायतीच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांचा प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय

संगमेश्वर : दि. १८ डिसेंबर

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीअंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत येथील व्यापाऱ्यांनी संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार असून ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

कडवई ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदवल्यानंतर गावात विविध उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामस्थांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नुकतीच कडवई बाजारपेठेतील गोविंदराव चव्हाण सभागृहात ग्रामपंचायत व व्यापारी यांच्यात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत ग्रामअधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केले. प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच शासनाच्या धोरणांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ग्रामपंचायतीच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कडवई बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी एकमताने संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांच्या या पर्यावरणपूरक निर्णयाचे ग्रामस्थांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी एज्युकेशन सोसायटी कडवईचे अध्यक्ष तसेच उमलती पृथ्वी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक काझी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सविस्तर माहिती देत या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. स्वच्छ, हरित व शाश्वत गावनिर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस हनुमान मंडळाचे अध्यक्ष बापू चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे, वरदान क्रीडामंडळाचे अमित खातू, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर व व्यापारी उपस्थित होते.
कडवईतील व्यापाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक आदर्श ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Breaking News

उपनगराध्यक्षांच्या शिवीगाळ प्रकरणी भाजप आक्रमक भूमिकेत. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन केले सादर

रत्नागिरी नगरपरिषदेत घडलेल्या उपनगराध्यक्षांच्या शिवीगाळ प्रकरणासंदर्भात आज भारतीय जनता...